वाझे के साथ ‘वो’ कौन थी? एनआयएचा शोध सुरू!

या स्त्रीच्या हातात नोटा मोजण्याचं मशीनही दिसत आहे. ही स्त्री कोण होती, तिचा या प्रकरणाशी काय संबंध, याचा शोध आता एनआयए घेत आहे.

पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडताना सचिन वाझे यांच्यासोबत असणारी ती अनोळखी स्त्री कोण होती, याचा शोध एनआयएकडून घेतला जात आहे. या स्त्रीच्या हातात नोटा मोजण्याचं मशीन देखील होतं, असा दावा एनआयएने केला आहे. तसेच या पंचतारांकित हॉटेलमधील एक खोली १०० दिवसांसाठी बूक करण्यात आली असून, त्याचे भाडे दक्षिण मुंबईतील एक व्यावसायिक भरत असल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे. त्यामुळे आता या व्यावसायिकाचा कसून शोध घेण्यात येत आहे.

अशी ठरली वाझेची योजना

दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली मोटार उभी करण्याची योजना सचिन वाझे याने आखली होती. त्यासाठी त्याने महिन्याभरापूर्वी या हॉटेलमध्ये एक खोली बूक केली, असा संशय एनआयएला तपासादरम्यान आला आहे. तब्बल १०० दिवसांसाठी ही खोली बूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी एनआयएचे पथक वाझे यांना घेऊन या पंचतारांकित हॉटेलमध्ये तपासासाठी गेले होते. एनआयएच्या या तपासात धक्कादायक गोष्टी बाहेर पडल्या आहेत.

ती स्त्री कोण?

सचिन वाझे यांनी खोट्या नावाने या हॉटेलमध्ये खोली बूक केली होती, त्याचा पुरावा म्हणून एनआयएच्या हाती वाझे यांचे छायाचित्र असलेले एक बोगस आधारकार्ड सापडले आहे. यावरुन वाझे याने या हॉटेलमध्ये योजना आखल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. दरम्यान एनआयएच्या हाती हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज देखील आले असून, त्यात वाझे यांच्याकडे काही बॅग दिसून येत आहेत. एका बॅगेत जिलेटीन कांड्या होत्या, असा संशय एनआयएला आहे. तसेच वाझेसोबत एक अनोळखी स्त्री फूटेज मध्ये दिसून येत आहे, या स्त्रीच्या हातात नोटा मोजण्याचं मशीनही दिसत आहे. ही स्त्री कोण होती, तिचा या प्रकरणाशी काय संबंध, याचा शोध आता एनआयए घेत आहे.

‘त्या’ १०० दिवसांचे भाडे कोणी भरले?

सचिन वाझेने ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बूक केली होती, त्या खोलीचे १०० दिवसांचे भाडे तब्बल २० लाख रुपये झाले आहे. धक्कादायक म्हणजे हे भाडे दक्षिण मुंबईतील झवेरी बाजारातील एका व्यवसायिकाने भरले, असे एनआयएच्या चौकशीत समोर आले आहे. या हॉटेलच्या एका खोलीचे एका दिवसाचे भाडे १३ हजार असल्याचे समजते. तसेच इतर खान-पान मिळून २० लाखांचे बिल झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या हॉटेल चे भाडे भरणारा हा व्यवसायिक कोण आहे, याचा शोध एनआयए घेत आहे. या व्यवसायिकाच्या शोधासाठी एनआयएचे एक पथक बुधवारी झवेरी बाजार येथे आले होते, अशी माहिती समोर येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here