शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सोडून गेल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाहेरुन आयात केलेल्यांच वर्णी शिवसेना उपनेतेपदी लावली. त्यामुळे शिवसेनेतच आता निष्ठावान शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. मनसेतून शिवसेनेत आलेल्या दक्षिण मुंबईतील आशा मामिडी यांची वर्णी काही महिन्यांपूर्वीच उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने उपनेतेपदी लावली होती. परंतु आता मामिडी यांनीही उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे, खासदार गजानन किर्तीकर आणि उपनेत्या आशा मामिडी यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता बाहेरुन आलेल्यांची वर्णी या नेते व उपनेतेपदी लावली जाणार आहे की निष्ठावंतांची वर्णी लावली जाणार असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह १२ खासदार आणि इतर पदाधिकारी सोडून जात स्वतंत्र गट बनवल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने भास्कर जाधव यांना शिवसेना नेतेपदी बढती दिली. त्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची वर्णी नेतेपदी न लावता अनिता बिर्जे यांना उपनेत्या म्हणून नियुक्ती केली. परंतु त्यानंतर काँग्रेसमधून आलेल्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि आंबेडकरी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे यांची उपनेता पदी वर्णी लावली. परंतु यानंतर पसरलेल्या नाराजीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर, दक्षिण मुंबईतील पदाधिकारी आशा मामिडी आणि उत्तर मुंबईतील शिवसेना पदाधिकारी संजना घाडी यांची नियुक्ती उपनेता पदी लावली.
शिवसेनेत प्रारंभी १२ नेते असून २९ उपनेते होते. पण या १२ नेत्यांमध्ये एकाही महिलेचा समावेश नव्हता. तर २९ उपनेत्यांमध्ये उपनेत्यांचा समावेश होत्या. परंतु ज्यात डॉ. निलम गोऱ्हे, विशाखा राऊत आणि मिना कांबळी या तीन महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी, अनिता बिर्जे,सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, संजना घाडी, आशा मामिडी यांची वर्णी लावली. किशोरी पेडणेकर यांनी प्रवक्तेपदाबरोबरच उपनेता पद आपल्या खेचून घेतल्यानंतर ही सुषमा अंधारे यांच्या वाढत्या प्रस्थापुढे त्या काहीशी नाराज आहेत. या नाराजीनंतरच उपनेत्या आशा मामिडी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मामिडी यांच्यापूर्वी शिवसेना नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनीही बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक नेतेपद आणि उपनेतेपद पुन्हा रिक्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या भास्कर जाधव यांना देण्यात आले आहे. परंतु ठाण्यातील खासदार राजन विचारे यांची वर्णी नेतेपदी लावता आलेली नाही. याशिवाय कोकणात राणे कुटुंबाशी सामना करणारे एकमेव वैभव नाईक असून त्यांनाही उपनेते बनवले नाही. त्यामुळे मुंबईतील आशा मामिडी यांच्या रिक्त उपनेतेपदी सहा वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या व माजी महापौर श्रध्दा जाधव, शिवसेनेची रणरागिणी राजुल पटेल या निष्ठावंत शिवसैनिकांची उपनेतापदी लागणार की बाहेरुन आयात केलेल्यांना यापदावर बसवण्यात येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपनगरांमध्ये आमदार रविंद्र वायकर आणि सुनील प्रभू हे निष्ठावंत शिवसैनिक असूनही त्यांची वर्णी उपनेतेपदी लावली आणि नाही नेतेपदी लावली. उलट भास्कर जाधव नेते बनले आणि बाहेरुन आलेले सचिन अहिर, मनोज जामसूतकर हे उपनेते बनले. त्यामुळे शिवसेनेतील नेते आणि उपनेतेपद हे यापुढे निष्ठावंतांनाच दिले जाणार आहे की बाहेरुन आलेल्यांना असा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे.