भाजपची युती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी, मनसेची युती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी?

124

आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची युती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी असल्याची जाहीर घोषणा यापूर्वीच भाजपने केली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून मनसेसोबत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतची जवळीक अधिक वाढल्याने या पक्षासोबतच्या युतीचे वारे जोरात वाहू लागले आहे. परंतु मनसेची युती भाजपशी होणार नसून बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत मनसेची युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मूळ युती ही भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेशी होणार असून बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत मनसेची युती होऊ शकते, असे बोलले जात आहे.

( हेही वाचा : अंधेरी पूर्व मतदारसंघात १ नोव्हेंबरपासून प्रचारबंदी)

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाशी युती करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील युतीबाबत खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर घोषणा केली आहे. राज्यातील दोन्ही पक्षांचे युतीचे सरकार असल्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही या दोन्ही पक्षाच्या युतीत लढवली जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. परंतु या दोन्ही पक्षांसोबत मनसेची जवळीक वाढू लागली आहे, त्यामुळे मनसेच्या युतीबाबतही चर्चांना उधाण येऊ लागले आहे.

अंधेरी पूर्व येथील विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केल्यानंतर भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत राज ठाकरेंचा मान राखला. त्यानंतर मनसेच्या शिवाजीपार्क येथील दीपोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रपणे सहभागी झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जवळीक दोन्ही पक्षांसोबत वाढली जात असल्याने तिन्ही पक्षांची एकत्र युती होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मात्र, भाजप आणि मनसेची युती तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने भाजपला मनसेसोबत युती करण्यात बऱ्याच अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेची युती ही भाजपसोबत होण्याची शक्यता कमी असून भाजपची मूळ युती ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबतच होईल आणि या पक्षासोबत मनसे युती करून या तांत्रिक अडचणीवर मात केली जाईल, असे बोलले जात आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२७ की २३६ प्रभाग याबाबत अजून न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झालेला नसून यापैंकी जे प्रभाग असतील त्या आधारे जागांचे वाटप भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षांमध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान ८३ जागी असलेल्या नगरसेवकांच्या ठिकाणी भाजपचे उमेदवार हे निश्चित असतील. याशिवाय ज्या जागी दुसऱ्या क्रमांकावर अगदी काठावर पराभव पत्करले आहेत किंवा जिथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला अशा ठिकाणी भाजप आपल्या पार पारड्यात पाडून घेत उर्वरीत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले व अन्य ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला शंभरच्या आसपास जागा सोडल्या जाणार असून त्यातील काही जागा मनसेसोबत युती करून त्यांच्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष सोडेल,असे बोलले जात आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत मनसेची युती झाल्यास भाजप पक्ष शिंदे गटासाठी जेवढ्या जागा सोडेल, त्यातून बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे यामध्ये जागेचे वाटप होईल,असे बोलले जात आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत मनसेची युती घडवून अप्रत्यक्ष भाजप मनसेला आपल्यासोबत घेऊन महापालिकेचे मैदान मारण्याचा प्रयत्न करणार असल्याची बोलले जात आहे. विशेष म्हणजे मनसेची युती ही तांत्रिक दृष्ट्या भाजपसोबत नसली तरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत मनसेची युती करून तिन्ही पक्ष एकत्र येवू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.