राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईकडे बघायला ‘वेळ’ नाही! मग कोण करणार नेतृत्त्व?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर आली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेतृत्व कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजवर मुंबईची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असली, तरी मागील काही महिन्यांपासून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची नावे पुढे येत आहेत. परंतु आता या दोन्ही नेत्यांचे मुंबईकडे दुर्लक्ष होत असून, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक हेही मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष आहे.

कुठे गेले हे दोन नेते?

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी मानली जात आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येत महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. राज्यात सत्तेची मोट बांधल्यानंतर मुंबईची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह मुंबईत लक्ष वेधण्यास सुरुवात केली होती. मुंबईतील विविध कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही नेते एकत्र दिसत होते. एकप्रकारे मुंबईचे नेतृत्व हे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आपल्या हाती घेत असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच, अचानकपणे या दोन्ही नेत्यांचे मुंबईकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अजित पवार यांना धक्का देण्यासाठी मुंबईचे नेतृत्व रोहित पवार यांच्याकडे देण्याचा सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न असला, तरी निवडणूक काही महिन्यांवर असतानाही मुंबईतील या पक्षाचे नेतृत्व कुठे दिसत नाही.

(हेही वाचाः फक्त घोषणाच नाही, काँग्रेसची स्वबळासाठी तयारीही सुरू)

संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष

एका बाजूला काँग्रेस पक्ष स्वबळाचा नारा देत एकप्रकारे मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरुन पक्षात जान आणण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ जनता दरबाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या व्यतिरिक्त संघटनात्मक बांधणीकडे पक्षाच्या नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्षपद हे नबाव मलिक यांच्याकडे असले, तरी त्यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी असल्याने त्यांचे लक्ष पक्षाच्या संघटनात्मक बाबींकडे कमी होत आहे.

कोणाच्या खांद्यावर जबाबदारी?

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन अहिर, संजय दिना पाटील, प्रकाश सुर्वे, सुर्यकांत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील एकमेव चेहरा म्हणजे नवाब मलिक हेच आहेत. परंतु पक्षात रविंद्र पवार, संतोष धुवाळी, अजित रावराणे यांच्यासारखे नेतृत्व क्षमता असलेली व्यक्तिमत्वे आहेत. याशिवाय महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव असल्या, तरी त्यांच्याकडे नेतृत्व क्षमतेचा अभाव आहे. परंतु मुंबईतील नेतृत्व हे सध्या अजित पवार गट आणि सुप्रिया सुळे गट यांच्यामध्ये अडकलेले असून, आगामी निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर सोपवून मुंबईला एक नवीन नेतृत्व देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचाः मुंबईसमोर समस्यांचा ‘तिढा’, पण गप्प आहेत भाजपचे ‘लोढा’…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here