शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?

171

ठाण्यातले आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राजकीय धुमाकूळ माजलेली आहे. याआधीही शिवसेनेतून अनेक नेत्यांनी बंड केलेलं आहे. त्यातले तीन मोठे नेते म्हणजे छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे. त्यात राज ठाकरे यांचा बंड हा मोठा होता. कारण ते जाताना पक्षातले अनेक चांगले नेते घेऊन गेले होते. पण त्याकाळी स्वतः बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रिय असल्यामुळे खूप मोठी हानी पोहोचवता आली नाही.

पक्षप्रमुख म्हणून त्यांना वचक नाही हे सिद्ध झाले

आता मात्र बाळासाहेब नाहीत. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. अशा वेळी ३० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गेले आहेत. ही बंडाळी सर्वसामान्य नाही. थेट पक्षप्रमुखाविरोधातंच हे बंड आहे. समजा हे बंड फसलं आणि कसेबसे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून उरलेली अडीच वर्षे पूर्ण केली तरी पक्षप्रमुख म्हणून त्यांना वचक नाही हे सिद्ध झालेलं आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेस म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना म्हणजे ठाकरे. राज्याराज्यांत कॉंग्रेसमध्ये आपापसात बंड होणं स्वाभाविक आहे. केंद्रात बंड म्हणजे जसं कुटुंबाविरोधात बंड तसं इथेही ठाकरे कुटुंबाविरोधातलं हे बंड आहे. हे बंड अचानक झालेलं नाही. सखोल योजना आखून झालेलं आहे. ३० पेक्षा अधिक आमदार एका रात्रीत एकनाथ शिंदेंकडे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेत हे आपणा सर्वांनाच माहित आहे. आता ते पक्षप्रमुख म्हणूनही अपयशी ठरल्याचं सिद्ध झालेलं आहे.

( हेही वाचा : शिंदेंच्या राजकीय उदयामुळे राज ठाकरेंना धोका निर्माण होणार का?)

उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेऊन आपण खुर्ची सोडणार नसल्याचं म्हटलेलं आहे. आता हा संघर्ष कसा पुढे जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकनाथ शिंदेंनी नेमूद दिलेला प्रतोद वैध ठरवला गेला आणि कल शिंदेंच्या बाजूने लागला तर ही बंडाळी यशस्वी होईल. आता ३४ आमदारांची सही आहे, यात अजून ३ आमदार मिळाले तर विधिमंडळातील पक्ष त्यांच्या ताब्यात येईल. आता इतकं मोठं बंड करुन ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राहतील याची शक्यता कमीच आहे.

शिवसेना शक्तिप्रदर्शन करेल. समजा विधिमंडळातंही उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकली तरी भविष्यात मात्र त्यांच्या पक्षाला अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण एकनाथ शिंदेंनी थेट मूळावरच घाव घातलेला आहे. शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची अशी परिस्थिती शिंदेंनी निर्माण केलेली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनेवर पकड नाही हे शिंदेंनी खरं करुन दाखवलेलं आहे. शिंदेंची ही खेळी फसली तरी ते बाजीगर ठरणार आहेत. उद्धव ठाकरेंनी इमोशनल ब्लॅक्मेल केले असले तरी आता इमोशनल ब्लॅकमेल करुन आमदारांचे डोळे भरुन येणार नाहीत हे उद्धव ठाकरेंना कोण समजावेल? शिवसेना कोणाची हे लवकरच कळणार आहे…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.