आशिष शेलारांची गाडी सिल्व्हर ओककडे का वळली?  

110

सध्या भाजपासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही एखाद्या छोट्या राज्याच्या निवडणुकीइतकी महत्वाची बनली आहे. म्हणून चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले, त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची हजेरीही घेतली. अशा या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्या प्रत्येक हालचालीवर माध्यमांचे लक्ष असते. शेलार माध्यमांच्या ‘नजरेत’ असल्याने त्यांची सोमवारी, १२ सप्टेंबर रोजी चांगलीच गोची झाली.

माध्यमांचे कॅमेरे आणि शेलारांची त्रेधातिरपीट

सोमवारी सकाळपासून आशिष शेलार अचानक चर्चेत आले. कारण आशिष शेलार यांची गाडी सिल्व्हर ओकच्या दिशेने जात होती, मात्र माध्यमांचे कॅमेरे पाहिल्यावर अचानक शेलारांच्या चालकाने युटर्न घेतला आणि थेट सागर बंगला गाठला. आशिष शेलारांच्या या ‘युटर्न’ने माध्यमांमध्ये ब्रेकिंग सुरु झाली. आशिष शेलार सिल्व्हर ओककडे जात होते, मात्र माध्यमांचे कॅमेरे पाहून ते वळाले, अशी बातमी झळकू लागली. त्यामुळे आशिष शेलार यांची चांगलीच गोची झाली. याविषयी शेलारांच्या निकटवर्तीयांशी चर्चा केली जे स्वतः शेलारांच्या गाडीत बसले होते, त्यांनी मात्र या सर्व प्रकारचे खापर चालकावर फोडले. आम्ही सागर बंगल्यावर जाणार होतो, मात्र माध्यमांना कुणीतरी आम्ही सिल्व्हर ओककडे जाणार आहोत, असे कळवले होते, त्यामुळे माध्यमांनी त्यांचे कॅमेरे आधीच सिल्वर ओककडे लावून ठेवले होते. चालकालाही आपल्याला सिल्व्हर ओककडे जायचे आहे, असे वाटले म्हणून त्यांनी त्या दिशेने गाडी दाबली, मात्र त्याच वेळी आशिष शेलार यांनी चालकाला तात्काळ सांगितले की, ‘कुठे जातोस आपल्याला सिल्वर ओक कडे जायचे नाही तर सागर बंगला येथे जायचे आहे’, असे म्हटले. त्यामुळे चालकाने तात्काळ युटर्न घेत गाडी वळवली.’  आशिष शेलार यांच्या गाडीने घेतलेला युटर्न माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेला आला.

(हेही वाचा काँग्रेसची भारत जोडो यात्रा नाही, तर आग लगाओ यात्रा! संघाच्या गणवेशाचा अवमान, भाजपाचा पलटवार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.