निवडणुकीतून माघार; हा कोणता मास्टर स्ट्रोक आहे?

134

भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत माघार घेतली आहे. गंमत म्हणजे राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना त्यासंबंधित पत्र देखील लिहिले होते. त्यानंतरच ही माघार घेण्यात आली. अनेकांना असा गोड गैरसमज झाला की राज ठाकरेंनी सांगितले आणि फडणवीसांनी ऐकले. पण विचार करा, राजकारणात कधी असं होतं का? आपला पक्ष वाढवणे, तो सत्तेवर आणणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा मुख्य उद्देश असतो. अशा वेळी भाजपला अचानक राजकीय संस्कृती कशी काय आठवली.

( हेही वाचा : शिवसेनेच्या टीकाकारांनाच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीत स्थान )

मुळात या निवडणुकीच्या निमित्ताने जर कुणाचं सर्वात जास्त नुकसान झालं असेल तर ते उद्धव ठाकरेंचं आहे. तशीही ती जागा त्यांचीच होती. उलट आता त्यांचं चिन्हं गोठवलं गेलं. आणि भविष्यात हे चिन्ह मिळेल की नाही यावर प्रश्न चिन्ह आहे. एकनाथ शिंदेंचं तर काहीच गेलं नाही. राज ठाकरेंनी वेळेवर पत्र लिहून बाजी मारली. आता राज हे सुसंस्कृत राजकीय नेते आहेत अशी एक इमेज झाली आहे.

आता मूळ मुद्दा असा आहे की, भाजपने माघार का घेतली. नाना पाटोळे म्हणतात त्याप्रमाणे यामध्ये क्रिकेटचे राजकारण असेल का? आशिष शेलार आणि शरद पवारांमध्ये काही डिल झाली असेल का? पण क्रिकेटची निवडणूक झाली आहे. अंधेरीची निवडणूक बाकी आहे. तरी देखील भाजप माघार घेत असेल तर यात बरेच काही लपलेले आहे. पडद्यामागे नक्की काय घडलं, हे कदाचित कधीच कुणाला कळणार नाही.

पण एक गोष्ट आहे की हा भाजपचा कोणताही मास्टर स्ट्रोक नसून ही अपरिहार्यता आहे. भाजपने यामधून काहीतरी कमावले आहे किंवा काहीतरी गमावण्यापासून वाचवले आहे. या दोन कारणांशिवाय तिसरे कारण असण्याची शक्यता नाही. परंतु मला इथे सांगावेसे वाटते की भाजपची टायमिंग चुकली. आता राजकीय संस्कृती वगैरे आठवण्याचं कारणच नव्हतं. हा निर्णय किमान एक आठवडा अगोदर घेतला असता तर भाजपची लाज राहिली असती. परंतु आता समाजात असा संदेश पसरतोय की पराभवाच्या भीतीने भाजपने माघार घेतली आहे. यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक नाराज झाले आहेत. म्हणून ज्या कुणाला असं वाटतंय की हा मास्टर स्ट्रोक आहे, तर हा मास्टर स्ट्रोक यंदा भाजपलाच भारी पडला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.