ठाकरे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेच का?

196

राज्यसभा निवडणुकीत ठाकरे सरकारला देवेंद्र फडणवीसांनी धक्का दिल्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही फडणवीसांनी ठाकरे सरकारने दुसरा जबरदस्त धक्का दिला. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताच रातोरात फडणवीस यांनी शिवसेनेच्या पहिल्या फळीतील एकनाथ शिंदे यांना फोडून त्यांच्यासोबत सुमारे ३४ आमदारांना गुजरातमध्ये घेऊन गेले. या बंडखोर आमदारांचे एकनाथ शिंदे हे नेतृत्व करत आहेत. फडणवीस यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचीच का निवड केली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांचे शिंदेंच्या विरोधात होते आदेश!

एकनाथ शिंदे यांना पक्षात डावलले जात असल्याची गेली वर्ष-दीड वर्ष चर्चा होती. सनदी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती जर सत्य असेल तर एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास संदर्भातील किंवा राज्य रस्ते विकास महामंडळातील कोणत्याही फाइल्स मंजूर करू नयेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे म्हटले जाते. नगरविकास खात्याचा निधी देण्याची बाब असो अथवा एमएसआरडीसीचे प्रकल्प, यामध्ये एकनाथ शिंदे यांचे कुठलेही काम गेले वर्ष-दीड वर्ष झालेले नाही, असे सांगितले जाते.

(हेही वाचा सरकार पडले तर विरोधी बाकात बसू! शरद पवारांचे महत्वाचे विधान)

शिंदेंच्या खात्यावर होत होता अन्याय    

पक्षाच्या आमदारांना थेट निधी देण्यापेक्षा त्यांच्या मतदार संघामध्ये नगर विकासचा मोठ्या प्रमाणात निधी देऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर एकनाथ शिंदे यांचा भर होता, असे म्हटले जाते. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या अनेक आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडे वळवले होते. हीच बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खटकल्याचे म्हटले जाते. जून 2019 पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 2000 प्रकरणांना स्टे दिला आहे, अशी शिंदे यांच्याकडून तक्रार केली जात होती. तशातच असे सांगितले जाते की, नगरविकास सचिव आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक यांना मुख्यमंत्र्याकडून सांगण्यात आले होते की, शिंदे यांच्या कोणत्याही फायलीवर सह्या करू नये असे निर्देश दिले होते, असा दावा सनदी अधिकाऱ्याकडून केला गेला. यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड अस्वस्थ होते. शिंदे यांनी काही आयएएस अधिकारी आणि त्या खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते. ते देखील मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्याचे सांगितले जाते.

(हेही वाचा फडणवीसांनी ‘पहाटे’ची ती चूक सुधारली!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.