गोपीचंद पडळकर…भाजपचे आमदार…मात्र हेच पडळकर शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर सातत्याने टीका करत असल्याने नेहमी चर्चेत असतात. शरद पवार यांच्यावर टीका करणे हा एकमेव अजेंडा असलेले पडळकर आता पुन्हा चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याने आता राजकीय वातावरण चांगले तापले असून, आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. एवढेच नाही तर आता रस्त्यावर उतरण्याची भाषा दोन्ही पक्षातील नेते करू लागले आहेत. त्यामुळे आता हा शाब्दिक वाद भविष्यात रस्त्यावर आणखी तीव्रपणे पहायला मिळाला, तर आश्चर्य वाटायला नको.
शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणे शंभर टक्के चुकीचे आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणे हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही.
– निलेश लंके, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
पडळकरांना ती टीका भारी पडली!
शरद पवार मोठे आहेत हे मी स्वत: मानत नाही. कोण मानत असतील त्याचं मला देणंघेणं नाही. साडेतीन जिल्ह्याचा स्वामी आणि ज्याचे तीन खासदार आहेत त्यांना मोठं कोण मानणार?’ असे म्हणत पडळकरांनी पवार मोठे नेते नसल्याचे वक्तव्य केले होते. एवढेच नाही तर मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांचे या राज्यात 3 ते 4 खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण कोंबड्याला काय वाटते की, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पण यांचे असे झाले आहे की, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशीबात… अशी परिस्थिती या लोकांची चालू आहे. यामुळे त्यांनी असेच दबा धरुन बसावे. पुढच्या लग्नात कधी तरी ससा यांना सापडेल. याबद्दल माझी काही हरकत नसल्याचे पडळकर म्हणाले.
(हेही वाचा : ‘नानां’ना हवे मंत्रीपद, नितीन राऊतांची पडणार विकेट? विधानसभा अध्यक्ष होणार?)
याआधीही पवारांवर टीका
गोपीचंद पडळकर यांची टीका करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यआधी देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचे आणि लढवायचे हेच धोरण त्यांनी राबवले आहे. त्यांनी ६० बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केले आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असे सांगतानाच पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी केली होती. तर फेब्रुवारी महिन्यात गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ते म्हणाले, की शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचे काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत, अशी टीका त्यांनी केली होती.
Join Our WhatsApp Communityआमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही.
– निलेश राणे, भाजप नेते