मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला एका महिन्याची मुदत देऊन आपले उपोषण स्थगित केले. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जालन्याच्या वडीगोद्रीत अजूनही उपोषण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवार यांना सवाल विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मागील ५० वर्षांपासून राजकारणात आहेत. मग त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही?, अशी विचारणा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मागील ५० वर्षांपासून राजकारणात आहेत. मग त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? आज राजकीय स्वार्थापोटी समाजाचे तुकडे पाडले जात आहेत. हे बरोबर नाही. अनेक संत महंतांनी समाज एकजूट राहण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यामुळे कुणीही तेल टाकण्याचे काम करू नये. तुम्हीही त्यात भस्म व्हाल. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. पण ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर त्यांनी अगोरच्या त्रुटी दूर करून १० टक्के आरक्षण दिले, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
(हेही वाचा महाडमध्ये गोरक्षकांना मारहाण; पोलिसांची निष्क्रियता; आमदार Nitesh Rane यांनी थेट दिला इशारा; म्हणाले…)
जरांगेंचे समाधान करणार
रक्ताचे नातेवाईक असणाऱ्या कुणालाही जात पडताळणी करण्याची गरज नाही. पण सरकारने त्यात काही खोट करून ठेवली आहे असे मनोज जरांगे यांचा दावा आहे. पण ब्लड रिलेशनशिप (रक्ताचे नातेवाईक) व सगेसोयरे हा एकच शब्द आहे हे आम्ही त्यांना पटवून देऊ. जरांगेंच्या सूचनेनुसार सरकारने सगेसोयरेची अधिसूचना काढली. आता त्यांना आणखी काय हवे आहे हे पाहिले पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) याविषयी पुढे बोलताना म्हणाले.