मुख्यमंत्र्यांना नुकसान झालेले अन्य जिल्हे का दिसले नाहीत?

मुख्यमंत्र्यांचा दौरा केवळ तीन तासांचा आहे, किती किलोमीटरचा आहे, हे मोजून सांगू का?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री कोकण दौऱ्याला आले यातच आम्ही समाधानी आहोत, असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

165

राज्य सरकार नुकसानग्रस्त भागाला मदत करण्यापेक्षा केंद्राकडे बोट दाखवण्यात व्यस्त आहेत.   पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. महाराष्ट्रात का आले नाही? असा सवाल काही मंत्र्यांकडून सतत करण्यात येत आहे. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यांत का आले? वादळाचा फटका रायगड, पालघर, सातारा जिल्ह्याला बसला असून मुख्यमंत्री तिकडे का गेले नाहीत? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

‘निसर्ग’ वादळाची मदत अद्याप पोहचली नाही!

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सिंधुदुर्गातील नुकसानीची  पाहणी केली. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि मालवण तालुक्यातील चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली. आंबा बागायती, मच्छीमारांचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी आपत्तीग्रस्तांची आपुलकीने विचारपूस करत त्यांना धीर दिला. भाजपा आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीदेखील यावेळी त्यांनी दिली. त्यावेळी माध्यमांसोबत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या वर्षी निसर्ग चक्री वादळावेळी सरकारने मदत जाहीर केली होती. परंतु ती अद्याप कोकणवासीयांपर्यंत पोहचली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करण्यात व्यस्त आहेत. पण नुकसानग्रस्त भागात मदतीचा दुष्काळ मात्र त्यांना दिसत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

कोकणाची पाहणी दोन तासांचीच?

मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका आणि प्रत्यक्षात तेच टीका करताना दिसत आहेत. वादळी संकटात कोकणवासी  पुरते बेजार झाले आहेत. आता त्यांना मदतीची गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांचा दौरा केवळ तीन तासांचा आहे, किती किलोमीटरचा आहे, हे मोजून सांगू का?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री कोकण दौऱ्याला आले यातच आम्ही समाधानी आहोत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

(हेही वाचा : पंचनामे पूर्ण होताच कोकणाला मदत! मुख्यमंत्र्यांची घोषणा )

एनडीआरएफची टीम तैनात का केली नाही?

कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. चार दिवस उलटून गेले तरी पंचनामे नाही, पंचनामे कधी होणार? नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार? बोटींचाही पंचनामा झालेला नाही, असे सांगतानाच अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर नुकसानीचे आकडे दाखवले आहेत. तेही अत्यंत कमी आकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर जरब बसवली पाहिजे. वादळाचा इशारा दिला असतानाही देवगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री पर्यटक म्हणून सिंधुदुर्गात आले! – आमदार नितेश राणे    

                                                                                                                               
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यटक म्हणून नुकसान न झालेल्या चिवला बीचवर पाहणी करून गेले. अवघ्या 3 तासांच्या दौऱ्यात केवळ 6 कि.मी. पाहणी करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिंधुदुर्गसह अवघ्या कोकणाची कुचेष्टा केली असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात सलग 3 दिवस नुकसानीची पाहणी दौरा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अवघ्या 3 तासांत झलक दाखवणारे मुख्यमंत्री यातून आता कोकणचे कैवारी कोण, हे जनतेनेच ठरवावे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.