नथुराम गोडसेंची भूमिका आव्हानात्मक! अमोल कोल्हेंची कबुली 

119

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर  देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात खळबळ उडवून देणारी घटना म्हणजे गांधी वध! या घटनेनंतर नथुराम गोडसे यांच्या नावाने हलकल्लोळ माजला. पुढे ७० वर्षे गांधींचा वध करणारे नथुराम गोडसे यांचे नाव भारतीय इतिहासात काळ्या शाईने लिहिले गेले, त्या नथुराम गोडसे यांची भूमिका आव्हानात्मक होती, अशी कबुली Why I Killed Gandhi या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

कोल्हेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!  

हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर लागलीच महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे. कालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांना नथुराम गोडसे का साकारावेसे वाटले? या चित्रपटातून त्यांनी नथुराम गोडसे यांचे समर्थन केले आहे का? ते ज्या पक्षाचे खासदार आहेत, त्या पक्षाची भूमिका गोडसे यांच्या भूमिकेशी समरस नसताना त्यांनी ही भूमिका का केली? याचे त्यांना राजकीय नुकसान होणार नाही का? असे अनेक प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात येत आहेत. त्यावर कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले.

(हेही वाचा शासन निर्णयाला आठ दिवस उलटले, तरी दुकानांवरील इंग्रजाळलेल्या पाट्या तशाच!)

काय म्हणाले अमोल कोल्हे? 

आपण कलाकार म्हणून ज्या भूमिका करतो त्यातील प्रत्येक भूमिकेशी आपली सहमती असते. काही घटनांशी आपली 100 टक्के वैचारिक सहमती असते. तर काही भूमिकांशी वैचारिक सहमती नसते. तरी सुद्धा ती भूमिका आव्हानात्मक वाटते, असे अमोल कोल्हे म्हणाले. मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये जे लिहिले आहे, त्याच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. मी 2017 साली त्या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट आता रिलिज होत आहे. या मधल्या काळात आता बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मी नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाची भूमिका कधीच घेतलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला कलाकार म्हणून ही भूमिका मांडायची असेल, कलाकार म्हणून मी काम केलेले आहे. यामध्ये कोणतीही गोष्ट नाकारण्याचे किंवा लपविण्याचे कोणतेही कारण नाही, हे मला प्रामाणिकपणे वाटते. व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या दोन्हींची गल्लत होऊ नये, अशीच माझी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.