मुंबईच्या आजारांचे डम्पिंग ग्राउण्ड, एम-पूर्व विभाग…

92

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली तरीही मुंबईतल्या डम्पिंग ग्राउण्डजवळ वसलेल्या गोवंडीत दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या गंभीर स्वरुपाच्या होऊ लागल्या आहेत. संपूर्ण मुंबईत या भागांत कुष्ठरोग, क्षयरोगाचे रुग्ण सर्वात जास्त संख्येने दिसून येतात. आता यात गोवर या संसर्गजन्य आजाराचाही शिरकाव झाला. लहान बालकांना गोवरची बाधा होत आता या भागांत मृत्यूचे प्रमाण वाढले आणि पालिका आरोग्य विभागाचे धाबे दणाणले. २०३० पर्यंत देशातून कुष्ठरोग, क्षयरोग तसेच गोवर या प्राणघातक आजारांचे निर्मूलन करायच्या केंद्र सरकारच्या हेतूला गोवंडीतील ढासळती आरोग्य व्यवस्था मोठे आव्हान ठरली आहे.

( हेही वाचा : हिवाळी अधिवेशनाला रेल्वेने जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार गैरसोय? )

मुंबईच्या डम्पिंग ग्राउण्डजवळ वसलेल्या शिवाजीनगर परिसर हा मूलभूत आरोग्य सुविधांबाबत सुरुवातीपासूनच दुर्लक्षित होता. रेल्वे स्थानक, पादचारी पूलाखाली राहणा-या श्रमिक वर्गाला पकडून यंत्रणांनी या डम्पिंग ग्राउण्ड परिसरात आणून ठेवले. पंधरा वर्षांपूर्वी केवळ तळमजल्यापुरती घर असलेल्या शिवाजीनगरात आता पत्रे आणि ताडपत्र्यांनी उभारलेली तीन माळ्यांची १०*१५ फूटांची घरे उभारलेली दिसतात. शिक्षणापासून फारकत असलेला हा श्रमिक वर्ग दिवसाच्या रोजंदारीवर जगतो. शिवाजीनगरच्या तब्बल दहा लाख लोकवस्तीची दिवसाची पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजचा संघर्ष आहे. कोणी सुतारकाम, कोणी विणकाम तर कोणी चप्पला शिवण्याचे काम करत मुंबईच्या एका टोकापासून प्रवास करत आपल्या गोवंडीतील घरात पोहोचतो. त्यांच्यासाठी गोवंडीबाहेर जाणे म्हणजे एका वेगळ्या जगात जाण्यासारखे आहे. कित्येकदा रेल्वेस्थानकापर्यंतच्या शेअर रिक्षाच्या प्रवासात भेटणारा श्रमिक वर्ग तुम्हांला हमे मुंबई जाना है, असे सांगतो. जगण्याचा रोजचा संघर्ष असलेल्या या वस्तीला आता गोवर या संसर्गजन्य आजाराने वेढले आहे. हा आजार समूळ नष्ट करायला पालिका आरोग्य विभागाने आता मोठ्या स्तरावर कंबर कसली आहे परंतु शिवाजीनगरमध्ये राहणा-या प्रत्येक झोपडीतील माणसांचे राहणीमान मूलभूत गरजा पुरवत सुधारणे हे कोणत्याही सरकारी यंत्रणेला शक्य झालेले नाही.

ताडपत्री लावलेल्या एका घरात आठ मुले अगोदरच जन्मली असताना आई पुन्हा पोटुशी असल्याचे दिसते… आपलं मूल जगेल की नाही याचीच मुळात शाश्वती नसल्यानं नव-याची इच्छा असेपर्यंत घरातील स्त्री केवळ मूल जन्माला घालायचे साधन बनलेली असते…निरक्षरांची वस्ती असलेल्या शिवाजीनगरात छोटे कुटुंब, निरोगी कुटुंब हा विचारच दूरापास्त असतो. लहान वयात लग्न झालेले असल्याने कित्येकदा माताच अनेमियाग्रस्त असतात. त्यामुळे जन्मलेले मूल आईसारखेच अनेमियाग्रस्त आणि कुपोषित असते. जन्मतः मूलाला मिळणारे औषधोपचार आणि लसीकरण सोडाच मूळात वैद्यकीय उपचारही गर्भवती महिलांना वेळेवर मिळत नाहीत. वाशी नाका येथील प्रसूतीगृह, सार्वजनिक आणि खासगी सलोख्यातून उभारलेले स्पंदन होम, नायर रुग्णालयातर्फे उभारलेले अर्बन हेल्थ सेंटर, पालिकेचे शताब्दी रुग्णालय या पालिकेच्या आरोग्य केंद्रांना अद्यापही स्थानिक महिला वर्ग उपचारांना पसंती देत नाही. मनुष्यबळ तसेच अद्यायावत मशीनची कमतरता यामुळे आरोग्याच्या तपासणीसाठी धडपडणारा हा श्रमिक वर्ग थेट दक्षिण मुंबई गाठतो.

‘अपनालय’ या समाजसेवी संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर तोरडे यांनी संपूर्ण गोवंडीतील मूलभूत आरोग्य व्यवस्थेबाबत अद्यापही सक्षम यंत्रणा उभारली गेली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या गोवंडीसाठी प्राथमिक आरोग्य यंत्रणा अद्याप संबंधित यंत्रणेने उभारलेली नाही. या महिला प्रसूतीसाठी सायन रुग्णालय किंवा थेट फोर्ट येथील जीटी रुग्णालय गाठतात. गोवंडी हा सुरुवातीपासूनच मूलभूत गरजांच्या उभारणीच्या प्रश्नावरुन पालिकेकडून दुर्लक्षिला गेला आहे. बालविवाह, कमी वयातच अनुभवलेले गर्भारपण यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्यांचा प्रश्न या भागांत भयावह स्थितीत आहे. कमी वजनाची कुपोषित मुलांचे प्रमाण जास्त असल्यानेच गोवरचा संसर्ग गोवंडीत झपाट्याने वाढल्याचा मुद्दाही तोरडे यांनी मांडला. पालिकेने आर्थिक तरतूद उभारुन तातडीने गोवंडीतील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणीही तोरडे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.