…म्हणून तळीये गावात बचावपथक वेळेत पोहचले नाही! मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण!

तळयी दुर्घटना असो किंवा सांगली, कोल्हापूर, चिपळूण, खेड या भागात ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

90

राज्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले, पुराचे पाणी मोठ्याप्रमाणात साचले होते, तरी काही ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी पोहचली, पण मदत कार्यासाठी लागणारे साहित्य, यंत्र सामुग्री पोहचवणे शक्य झाले नाही, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनातील पथकांनी काहीच केले नाही असे  म्हणणे चुकीचे ठरेल. शेवटी तेही माणसेच आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळयी गाव असो कि सातारा येथील आंबेघर गाव येथील दुर्घटनेत बचावकार्य वेळेत पोहचू शकले नाही, त्यामागील स्पष्टीकरण दिले.

taliye 2

महाड तालुक्यातील तळयी गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या ४२ वर पोहचली आहे. पाऊस सतत येत असल्यामुळे येथे मदत कार्यात अडथळे येत आहेत. शनिवारी अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गावाला भेट दिली, त्यांच्या सोबत पालकमंत्री अदिती तटकरे, मंत्री अनिल परब, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे होते. सध्याच्या प्रसंगातून धडा घेत आता ज्या ज्या भागात धोकादायक ठिकाणी वस्त्या असतील त्यांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, तसा आराखडा बनवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पूरस्थितीला कारणीभूत पाण्याचे व्यवस्थापन करणार!

सध्या पाऊस अत्यंत विचित्र कोसळत आहे. पावसाची सुरुवातच चक्रीवादळाने होऊ लागली आहे. मागील काही वर्षांपासून राज्यात ज्या प्रकारे पाऊस पडत आहे, त्यामुळे कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग पाण्याखाली जातो, प्रचंड नुकसान होते, त्यामुळे आता पावसाच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन अर्थात जल व्यवस्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

taliye 1

नुकसान भरपाई देणार!

पाऊस किती पडणारा, त्याचे परिमाण आणि परिणाम सांगणारी व्यवस्था नाही. ढगफुटी कुठे आणि केव्हा होणार हेही सांगता येत नाही, त्यामुळे अशावेळी ज्या ज्या भागात पुराच्या पाण्याने नुकसान होते, त्या त्या भागातील पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. तळयी दुर्घटना असो किंवा सांगली, कोल्हापूर, चिपळूण, खेड या भागात ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.