डेलकर आत्महत्येवर विरोधक गप्प का? मुख्यमंत्र्यांचा सवाल 

अंबानी प्रकरण एनआयएकडे देण्याचा डाव केंद्राचा असेल, तर याच्यात काहीतरी गौडबंगाल आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने सिल्वासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे. हा विषय गंभीर आहे, पण कदाचित याविषयी बोलण्यासाठी विरोधी पक्षाला तोंड नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

डेलकरांच्या सुसाईड नोटची चौकशी करणार!

केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अखत्यारित येतो हे सर्वांना माहित आहे. सात वेळा निवडून आलेल्या खासदाराने मुंबईत येऊन आत्महत्या करावी, हे तिथल्या प्रशासनाला लांच्छनास्पद आहे. सुसाईट नोट सापडली असून, त्यात काही उल्लेख आहेत, त्यांची चौकशी केली जाईल आणि कितीही मोठा असला तरी शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री होते त्यांचा सरकारवर विश्वास नाही. पण दुर्दैवाने मोहन डेलकर यांनी येथील सरकार योग्य ती चौकशी करेल आणि आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांना शासन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबियांनीही निवेदन दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली

अंबानी प्रकरणाचा तपास एटीएस करणार!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या मालकाचा मृतदेह आढळल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यादा प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येते तेव्हा यंत्रणा तीच असते. स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे, प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो तोदेखील आमच्याकडे आहे आणि म्हणून एटीएसकडे हा तपास दिला आहे. पण एनआयएकडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल, तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

(हेही वाचा : दिशाहीन, अर्थहीन अर्थसंकल्प! सुधीर मुनगंटीवार यांची टीका)

विरोधक राज्याची बदनामी करतात!

सरकार येते आणि जाते, पण मूळ यंत्रणांना बदनाम करता कामा नये. सध्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. महाराष्ट्रात काही व्यवस्थाच नाही आणि सगळे काही केंद्राच्या अखत्यारीत आहे, असे दाखवत आहेत. तसे असेल तर इंधन दरवाढीचा मुद्दाही त्यांच्या पदरात टाका, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here