– जयेश शत्रुघ्न मेस्त्री
शरद पवार यांचे राजीनामा नाट्य आता संपले आहे. अश्रू वाहणाऱ्या कार्यकर्त्यांना आता दिलासा मिळाला आहे. शरद पवारच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राहतील हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
आपण सर्वांनीच पवारांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी अजित पवारांना काकांवर लक्ष ठेवा असा सल्ला दिला होता. मात्र स्वतःवरही लक्ष ठेवा असं त्यांना सुचवायचं असावं. कारण एका भाषणात राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत अजित पवारांनी नक्कल करत म्हटलं की शरद पवार यांना राजीनामा द्यायचाच होता. पण अजित पवारांचं वागणं पाहून त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा.
राज ठाकरे यांच्या बोलण्यात कुठे तरी तथ्य आहे असं वाटतं. कारण आपल्या आवडीचा पक्ष प्रमुख बसवून शरद पवारांना पक्ष आणि पर्यायाने महाविकास आघाडी चालवता आली असती. पण पवार राजीनामा देत असताना अजित पवारांचं वागणं खटकत होतं. ते प्रचंड खुश असल्याचे दिसले आणि कार्यकर्त्यांवर ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्नही दिसून आला. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे ही शरद पवारांना धोक्याची घंटा वाटली असावी. आज राजीनामा देताना अजित पवार असे वागत आहेत तर पुढे ते कसे वागतील?
म्हणून अजित पवारांनी स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवायला पाहिजे होता. यानिमित्ताने ‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक, प्रसाद काथे यांचे ट्विट चर्चेत आले होते. “अजित पवार यांचे पूर्ण खच्चीकरण केल्याशिवाय राष्ट्रवादीत नवी रचना लागू होणे नाही. दादांना अजून अधिक अपमान सहन करायचे बळ मिळो.” असे ट्विट प्रसाद काथे यांनी केले होते.
थोडक्यात आता अजित पवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रसाद काथे यांच्या भाषेत त्यांना अपमान सहन करावा लागणार आहे. 2024 रोजी राष्ट्रवादीच्या विरोधकांच्या मदतीने काका आणि बहिणीचा निवडणुकीत पराभव केल्यानंतरच अजित पवारांना मनाचे स्थान मिळू शकेल असे वाटते.
Join Our WhatsApp Community