वाढीव वीजबिले आकारणारे अदानी मनसेला का झाले प्रिय? वाचा… 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्योगपती अदानी यांनी चालवण्यास घेतले, तेव्हा मनसेने मुंबई विमानतळाजवळ अक्षरशः पोस्टर लावून उद्योगपती गौतम अदानी यांचे अभिनंदन केले आहे.

कालपर्यंत अदानी म्हणजे लुटारू, सर्वसामान्यांना वाढीव वीबिले देऊन त्यांचे जगणे मुस्कील करतात म्हणून मनसेच्या रडारवर होते. मात्र तेच उद्योगपती अदानी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अभिनंदनास पात्र ठरले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हे अभिनंदन मनसेने जाहीररीत्या अगदी बॅनर लावून केले आहे. मनसेने अदानींबाबत भूमिका बदलली आहे का?, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

काय आहे प्रकरण? 

मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातच नव्हे तर जगात चर्चेचा विषय आहे. या विमानतळावर सर्वाधिक ट्रॅफिक असते. त्यामुळे हे विमानतळ कायम चर्चेत असते. असे हे विमानतळ चालवण्यासाठी खासगी कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव केंद्राने तयार केला होता. तेव्हा त्यावर टीका झाली होती. विमानतळाचे खासगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप होऊ लागला. मात्र प्रत्यक्षात जेव्हा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उद्योगपती अदानी यांनी चालवण्यास घेतले, तेव्हा मात्र मनसेने मुंबई विमानतळाजवळ अक्षरशः पोस्टर लावून उद्योगपती गौतम अदानी यांचे अभिनंदन केले आहे. त्यावेळी ‘विमानतळ चालवताना भूमिपुत्रांना रोजगार द्या, मराठी भाषा आणि महाराष्ट्र अस्मितेचा मान राखा’, अशी मागणी मनसेने केली आहे.

(हेही वाचा : मनसेचा प्रशासनाविरोधात खळखट्याक! घेतला हातोडा आणि…)

वाढीव वीजबिल प्रकरणी अदानी होते टार्गेट! 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ८-९ महिने लॉकडाऊन होता. त्या कालावधीत अदानी ग्रुपकडून भरमसाठ वीजबिले देण्यात आली होती, त्यावेळी अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात मनसेने उग्र आंदोलन केले होते. मनसे कार्यकर्त्यांनी थेट अदानी वीज कार्यालयावर धडक दिली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज ग्राहकांना वाढीव वीजबिले भरू नका, असे आवाहन केले होते. आता तेच अदानी मनसेकरता अभिनंदनास पात्र ठरत आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here