शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज, २७ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख न करता माजी मुख्यमंत्री असा केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा करण्यात आली असता, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाले ‘मी त्यांना…’)
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
शिवसेनेतून ऐतिहासिक बंड करून वेगळे झाल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे चर्चेत आहेत. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंनी त्यांना शुभेच्छा देणारे ट्वीट केले. मात्र त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख करणं टाळले. शिंदेंच्या ट्वीटवरील या शुभेच्छांनंतर चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरेंचा उल्लेख एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख न करता माजी मुख्यमंत्री असा केला. या विषयी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देणं शिंदेंनी टाळलं आणि तिथून निघून गेले. मी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, इतकंच एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. यासह माजी मंत्री गुलाबराव पाटील, शिवाजी आढळराव पाटील, धैर्यशील माने यांच्यासह काही शिंदे समर्थक नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांनी त्यांच्या नावापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केलेला आहे.
Join Our WhatsApp Community