शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १०वा स्मृतीदिन येत्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून या स्मृतीदिनानिमित्त मुंबईसह राज्यातील अनेक भागातील शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांच्या स्मृतीस वंदन करतात. परंतु स्मृतीदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यास उपस्थित राहत असतात. परंतु यंदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे हे असून काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या स्मारकासंबंधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष तोतया मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे या स्मृतीदिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करण्यास येतात की त्यांच्यावर नाराज शिवसैनिक त्यांना रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्कला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतिर्थ असे नाव दिले होते. बाळासाहेबांनी शिवाजीपार्कचा उल्लेख शिवतिर्थ म्हणून केला आहे. एकच मैदान आणि एकच व्यक्ती अशाप्रकारे बाळासाहेबांनी लाखोंच्या सभा घेऊन विशाल जनसमुदायाला विचारांचे सोने वाटले होते. शिवाजीपार्कवर बाळासाहेबांची तोफ शेवटच्या श्वासापर्यंत धडधडत राहिली. अखेर १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर शिवाजीपार्क मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्या जागेच्या शेजारी त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस वंदन करून आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासून शिवसैनिकांची गर्दी होते. मुंबईसह राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मोठ्याप्रमाणात बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी लोटला जातो. शिवसेना नेते, पदाधिकारी तसेच मंत्री आणि शिवसैनिक आदी रांगेत उभे राहून शिस्तीने वंदन करत असतात.
या स्मृतीदिनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे स्मृतीस्थळी भेट देऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करतात. परंतु यावेळेस राज्यात सत्तापालट झाली असून शिवसेनेत फुट पडून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटून त्यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. या युतीच्या सरकारमध्ये शिवसेनेतून फुटलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. परंतु एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटल्यानंतर मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच बाळासाहेबांचा स्मृतीदिन येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असल्याने आपल्या हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी स्मृतीस्थळावर उपस्थित राहू शकतात.
शिवसेना फुटल्यानंतर पहिला स्मृतीदिन येत असून शिवसेनेसमोर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आव्हान निर्माण केले. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी जोरदार शक्तीप्रदर्शन शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक मोठ्याप्रमाणात गर्दी करणार असून स्मृतीस्थळी शिवसेनेतून फुटून सरकार स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती शिवसैनिकांना रुचणारे नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे यांचा उल्लेख तोतया मुख्यमंत्री असे केला होता. त्यामुळे शिंदे यांना स्मृतीस्थळावर प्रवेश देण्यावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने ही नाराजी विरोधात रुपांतर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येणार असतील तर त्यांच्या स्वागताला उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कुणीही त्याठिकाणी उपस्थित राहणार नसल्याचेही बोलले जात आहे. त्यातच शिवसैनिक त्यांना विरोध करण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे याठिकाणी जाण्याचे टाळतील असेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community