सध्या राज्याचे राजकारण दसरा मेळाव्यावरुन पेटल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यात शिवाजी पार्कमध्ये होणा-या दसरा मेळाव्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच भाजपचे अनेक नेतेही राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आलं. त्यामुळे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेही उपस्थित राहतील या चर्चांना उधाण आले होते. आता याच प्रश्नावर एका खासगी वाहिनीला उत्तर देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज यांच्यासोबत जुने संबंध आहेत. राज ठाकरे यांची घेतलेली भेट गणेश दर्शनासाठी होती. दसरा मेळाव्याला अजून वेळ आहे. त्यामुळे राज ठाकरेंना बोलावण्यात येणार का याबाबत आताच सांगता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: बंद दाराआड आम्ही काहीच करीत नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला )
एकनाथ शिंदे- राजे ठाकरे भेट
1 सप्टेंबरला गणपती दर्शनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट गणेश दर्शनासाठी होती. पण, राज यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यातही राजकीय सहकार्य केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला कोणाकोणाला बोलावण्यात येईल, हे आताच सांगता येणार नाही. गणेशोत्सवानंतर याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थळही त्याचवेळी अंतिम होईल, असे शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे- ठाकरे भेटीनंतर सांगितले.
Join Our WhatsApp Community