महाविकास आघाडी सत्तेत येण्यामध्ये ज्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा होता, त्याच राऊतांमुळे सध्या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करा, असे केलेले वक्तव्य. संजय राऊतांच्या याच वक्तव्यामुळे राज्यातील काँग्रेस नेते नाराज झाले असून, संजय राऊत यांची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रार केली आहे. संजय राऊत यांची वक्तव्य हे आघाडीमध्ये मिठाचे खडे टाकण्याचे काम करत असल्याचेच काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यापुढे अशी वक्तव्य करू नये अशी समज संजय राऊत यांना द्या, असेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्री संजय राऊतांना समज देणार का, याची प्रतिक्षा काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना लागली आहे.
हायकंमाड देखील राऊतांच्या वक्तव्यावर नाराज
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर हायकमांड देखील नाराज असून, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट झाली. या भेटीदरम्यान देखील संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल उपस्थित केला होता.
(हेही वाचाः हे तर अॅक्सिडेंटल ‘होम मिनिस्टर’! देशमुखांबद्दल राऊतांचे ‘रोखठोक’ मत…)
राज्यातील नेत्यांनी अभ्यास कारावा
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार हे या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असे काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल, तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणे गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत असल्याचे राऊत म्हणाले होते.
(हेही वाचाः राज्यात ठाकरे सरकार कोसळणार?)
राऊत नेमके काय म्हणाले होते?
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. युपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ युपीएचे अध्यक्षपद भूषवले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्या प्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी युपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांचे म्हणणे आहे. अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष युपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून युपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Communityचर्चेत राहण्यासाठी संजय राऊत ही अशी वक्तव्ये करत असतात. नुकतीच नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती दिली आहे. आता मुख्यमंत्री संजय राऊत यांना काय समज देतात याची वाट बघू.
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते