राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार – देवेंद्र फडणवीस

64

युवा पिढीला विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान छेडण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची एक बैठक आज पुणे येथे झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीसांनी पोलिसांना केले आवाहन

या बैठकीत विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची स्थिती आणि त्यावर पोलिसांचा प्रतिसाद, गुन्हेवाढीची कारणे याचा समग्र आढावा या बैठकीत घेण्यात आला. अपराधसिद्धीचा दर वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सुद्धा चर्चा झाली. आता नव्या सरकारमध्ये बदल्या आणि पोस्टिंगसाठी भ्रष्टाचाराला कुणालाही सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा पारदर्शी पद्धतीने काम करावे आणि दलाला पूर्वीचा नावलौकिक प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फडणवीसांनी केले मार्गदर्शन 

या बैठकीत देवेंद्र फडणवीस सागरी सुरक्षेच्या प्रस्तावांना तातडीने गती देण्याचेही निर्देश दिले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी द्याव्यात, तपासावरील देखरेखीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यात यावी, वेगवेगळ्या जिल्ह्यातील चांगल्या तपास पद्धतींचा स्वीकार करावा, अशा सूचना देतानाच वाळू आणि दारुची तस्करी करणार्‍यांवर कठोर प्रहार करावा, असे निर्देश दिले. मादकद्रव्यांच्या बाबतीत पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका ठेवावी. उद्योगांना त्रास देणार्‍या संघटित गुन्हेगारीचा कसोशीने बिमोड करावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास अजीबात मागे-पुढे पाहू नका, अशा सूचना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. सीसीटीएनएस प्रणालीचा महत्तम वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सोशल मिडियाच्या दुरुपयोगाकडे सुद्धा पोलिस दलाचे बारकाईने लक्ष असावे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होतात. पोलिसांचा सरकारी वकिलांशी अधिकाधिक संवाद, तपासात त्रुटी न ठेवणे आणि त्यातून अपराधसिद्धीचा दर वाढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादींबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत मार्गदर्शन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना केले.

सर्वोत्कृष्ट पोलिस घटक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

राज्यातील पोलिस घटकांची कार्यक्षमता, कामगिरी वाढविणे, गुन्हेगारीला आळा, तपास, कायदा-सुव्यवस्था इत्यादी बाबतीत दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या पोलिस घटक स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. यातील २०२१चे पारितोषिक वितरण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पुरस्कारप्राप्तींची यादी खालीलप्रमाणे:

वर्गवारी अ

सर्वोत्कृष्ट पोलिस घटक : पोलिस अधीक्षक जालना (श्री विनायक देशमुख), पोलिस अधीक्षक रायगड (अशोक दुधे), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (सत्र न्यायालय दोषसिद्धी) : पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग (राजेंद्र दाभाडे), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर) : पोलिस अधीक्षक बीड (श्री आर. राजा), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक (कम्युनिटी पोलिसिंग) : पोलिस अधीक्षक गडचिरोली (श्री अंकित गोयल)

वर्गवारी ब

सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक : पोलिस आयुक्त, नागपूर (अमितेश कुमार), पोलिस आयुक्त पुणे (अमिताभ गुप्ता), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (दोषसिद्धी) : पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण (श्रीमती तेजस्वी सातपुते), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर) : पोलिस आयुक्त मीरा-भाईंदर, वसई विरार (सदानंद दाते), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (कम्युनिटी पोलिसिंग) : पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण (श्रीमती तेजस्वी सातपुते)

वर्गवारी क

सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक : पोलिस उपायुक्त परिमंडळ ६ : (कृष्णकांत उपाध्याय), पोलिस उपायुक्त परिमंडळ ११ (विशाल ठाकूर), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (दोषसिद्धी) : पोलिस उपायुक्त परिमंडळ १ (शशीकुमार मीना), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर) : पोेलिस उपायुक्त परिमंडळ ११ (विशाल ठाकूर), सर्वोत्कृष्ट पोलिस घटक (कम्युनिटी पोलिसिंग) : पोलिस उपायुक्त परिमंडळ ६ : कृष्णकांत उपाध्याय

२०२१ मध्ये केंद्र सरकारने देशातील सर्वोत्कृष्ट १० पोलिस स्थानकांमध्ये सांगलीतील शिराळा पोलिस ठाण्याची सातव्या क्रमांकावर निवड केली होती. त्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार तसेच केंद्रीय गृहमंत्री करंडक प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागाचे अपर पोलिस महासंचालक रितेश कुमार यांचाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

(हेही वाचा – सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार का?, याचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले..)

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.