सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांनी ईडीच्या अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने देशमुख यांची याचिका सोमवारी फेटाळून लावली. त्यामुळे देशमुख यांची अटकेपासूनची वाचण्याची सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा वेळी ईडीने मंगळवारी, १७ ऑगस्ट रोजी देशमुख यांना पाचवे समन्स जारी करून बुधवारी, सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यावेळी देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहतात का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेव्हा देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल, त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात जबाब देण्यासाठी हजर होईन’, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर देशमुख हे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार का? दिलेला शब्द पाळणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे.
(हेही वाचा : आता चर्चा शरिया कायद्याची…नेटकऱ्यांना का आठवले हमीद अन्सारी?)
काय आहे प्रकरण?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या आरोपावरून उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना या प्रकरणी अटक केली आहे. दरम्यान अनिल देशमुख यांना अनेक वेळा समन्स पाठवण्यात आले होते. तरी देखील देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिलेले नाही. दरम्यान ईडीने तिसरे समन्स पाठवल्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Join Our WhatsApp Community