मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले असून, आता या प्रकरणाकडे ठाकरे सरकार गांभीर्याने पाहत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता ठाकरे सरकारकडून, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती बनवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
म्हणून चौकशी समिती बनवणार?
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप गंभीर असून, यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा देखील मलीन होऊ लागली आहे. याचमुळे परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जरी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी देखील सध्या अनिल देशमुख हेच गृहमंत्री राहणार आहेत. मात्र येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. त्यावेळी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या गुरुवारी परमबीर सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात येईल. त्याच दिवशी समन्वय समितीची बैठक होऊन महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचाः अनिल देशमुख प्रकरणात ‘ही’ आहे शिवसेनेची भूमिका!)
काय आहे याचिकेत?
गृहमंत्र्यांनी चौकशी झाल्याचे कारण देत आपल्याला मुंबई आयुक्त पदावरुन पायउतार केल्याचे सांगितले होते. पण
मला कोणीही चौकशीसाठी बोलावले नाही. माझी कुठल्याही प्रकारची चौकशी एटीएस किंवा एनआयएकडून झालेली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची आणि आपल्या बदली मागच्या कारणाची चौकशी करावी, अशी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
काय म्हणाले देशमुख?
परमबीर सिंग यांनी पत्रात केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सांगत असताना आता त्यांनी या बाबतीत एक नवा खुलासा केला आहे. मला कोविड झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होतो. त्यानंतर मी थेट १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी होम क्वारंटाईन होतो व त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी मी पहिल्यांदाच सह्याद्री अतिथी कक्ष येथे बैठकीला गेलो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
Join Our WhatsApp Community