सध्या देशात राज्यसभेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरु आहे. एकूण ५६ जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यातील सहा जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे, मात्र त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे.
बुधवारी पंकजा मुंडे या फडणवीस यांना भेटायला सागर बंगल्यावर गेल्या होत्या, त्यांच्याशी राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली का, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते. पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्यसभेतील राज्याच्या सहा रिक्त जागांपैकी भाजपाला तीन जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला एक जागा मिळू शकते. उरलेल्या एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शखतो. मविआला दुसरी जागा निवडून आणायची असेल तर त्यांना आणखी १५ मतांची गरज लागेल. भाजपाला जर चौथी जागा निवडून आणायची असेल तर त्यांना शिंदे गट आणि महाविकास आघाडीमधील काही मतांची गरज भासेल.
कोणत्या राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपला?
प्रकाश जावडेकर (भाजपा), व्ही. मुरलीधरन (भाजपा), नारायण राणे (भाजपा), अनिल देसाई (शिवसेना उबाठा), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), कुमार केतकर (काँग्रेस)
Join Our WhatsApp Community