युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार, काय म्हणतात पोलीस?

151
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करून तीन दिवसांत त्याचा अहवाल सादर करावा, अशी विनंती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना दिले आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, मात्र ‘सेव्ह आरे’ या मोहिमेचे आयोजन वेगळ्या संस्थेने केले होते, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे या मोहिमेत सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का, याची चाचपणी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याचा अटीवर म्हटले आहे.
aditya 1

सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेची तक्रार

आरेमधील  मेट्रो कारशेडवरून सुरु असलेल्या वादावरून रविवारी, १० जुलै रोजी आरे येथे आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनात स्वतः युवा सेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हजर होते. या आंदोलनात लहान मुलांचा देखील वापर करण्यात आल्यामुळे सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मेल पाठवत कारवाई करण्याची मागणी केली आहे. सह्याद्री राईट्स फोरमने पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांचे ट्विट मेलमध्ये टाकले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमध्ये लहान मुले आंदोलनात सहभागी असल्याचे दिसत आहे.

आदित्य ठाकरे केवळ मोहिमेत सहभागी झाले होते

बाल न्याय हक्क कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी व त्याचा अहवाल ३ दिवसांत आयोगाकडे सुपूर्द करण्यात यावा, असे पोलीस आयुक्त यांना दिलेल्या पत्रात आयोगाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत हालचाली सुरू करून चौकशी सुरू केली आहे, चौकशीत आदित्य ठाकरे हे या मोहिमेत केवळ सहभागी झाले होते, या मोहिमेचे तसेच आंदोलनाचे आयोजक मात्र वेगळी संस्था असून याबाबत तपास सुरू असल्याचे समजते. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर म्हटले आहे की, जर कारवाई अथवा गुन्हा दाखल करायचा असेल तर केवळ आयोजकांवर होऊ शकतो, त्यात सहभागी झालेल्यावर गुन्हा दाखल कसा करता येईल असे म्हटले आहे, या गोष्टीचा निर्णय वरिष्ट अधिकारी घेऊ शकता, तूर्तास चौकशी सुरू असून आयोगाला याबाबत अहवाल लवकरच पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.