अखेर प्रशांत किशोर यांचे भाकीत खरे ठरणार?

भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळतील असा दावा काही महिन्यांपूर्वी प्रशांत किशोर यांनी केला होता. त्यामुळे आताचे निकाल पाहता त्यांचा हा दावा खरा ठरत आहे.

सगळ्यांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा दबदबा पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. हाती आलेल्या निकालानुसार, सध्या ममता दिदींचा तृणमूल काँग्रेस पक्ष २०७ जागांवर आघाडीवर असून, भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. मात्र आता या निकालानंतर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे भाकीत खरे ठरणार असल्याचे चित्र आहे. भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळतील, असा दावा काही महिन्यांपूर्वी प्रशांत किशोर यांनी केला होता. त्यामुळे आताचे निकाल पाहता त्यांचा हा दावा खरा ठरत आहे.

काय म्हणाले होते प्रशांत किशोर

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपला बंगालमध्ये 100 जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर मी अजूनही ठाम असल्याचे सांगितले होते. तसेच भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली तर देशात भाजपची एकाधिकारशाही निर्माण होईल, असे देखील ते म्हणाले होते.

(हेही वाचाः विधानसभा निवडणुकाः जल्लोष करणा-या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश)

शिवसेनेची भाजपवर टीका

पश्चिम बंगालमध्ये कोण नेतृत्त्व करू शकतो, यावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे विधान शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करुनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली, पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला, अशी टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो, राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने आपलं मत देतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते, हे सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here