स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात लखनऊ येथे गुन्हा दाखल झाला आहे. लखनऊच्या न्यायालयाने बुधवार, ५ मार्चला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना याप्रकरणी २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. राहुल गांधी हे सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयाने दंड ठोठावला. तसेच १४ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयात हजर राहावे, जर ते या तारखेलाही हजर राहिले नाहीत तर राहुल गांधी यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढू, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
तक्रारदार नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी १७ डिसेंबर २०२२ या दिवशी महाराष्ट्रातील अकोला येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी सावरकरांना (Veer Savarkar) ‘ब्रिटिशांचे सेवक’ आणि ‘पेन्शनधारक’ म्हटले होते. समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने हे विधान देण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (अ) आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पांडे यांनी केली होती.
राहुल गांधी सुनावणीला का गैरहजर राहिले?
सुनावणीदरम्यान, वकील प्रांशू अग्रवाल यांनी राहुल गांधी यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला की राहुल गांधी सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेते आहेत. ५ मार्चला त्यांची एका परदेशी मान्यवराशी पूर्वनियोजित भेट होती. इतर सरकारी कामात व्यस्त असल्याने ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही. ते न्यायालयाच्या आदेशांचा आदर करतात आणि जाणूनबुजून न्यायालयात हजर राहण्याचे टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत.
न्यायालयाचा इशारा
न्यायालयाने राहुल गांधींच्या अनुपस्थितीला हलके घेतले नाही आणि २०० रुपयांचा दंड ठोठावला आणि त्यांना १४ एप्रिल २०२५ रोजी सक्तीने हजर राहण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणीतही राहुल गांधी अनुपस्थित राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community