मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या पारंपरिक गुढीपाडवा मेळाव्यात भाजपावर अप्रत्यक्ष टीका केल्याने राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपासोबत जाणार की पुन्हा ‘एकला चलो रे’ला पसंती देणार? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये विचारला जाऊ लागला आहे.
विडंबन मनाविरुद्ध?
मनसेचे मुंबई अध्यक्ष आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संदीप देशपांडे यांनी शनिवारी, ३० मार्च २०२५ या दिवशी मेळाव्यात भाषण केले त्यात त्यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून त्यांचे नाव घेत टीका केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संमतीशिवाय बांधण्यात आली असेल का? किंवा छत्रपती संभाजी राजे यांनी औरंगजेबची मनसबदारी स्वीकारली, ती शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय असेल का? त्या-त्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतलेले असू शकतात, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात म्हटले. याच तत्वानुसार संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर विडंबन कविता केली ती राज ठाकरे यांच्या मनाविरुद्ध असेल का? असा तर्क सर्वसमान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
भाजपाने डिवचले
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुंभमेळयातील गंगेच्या पाण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर खोक्या या आरोपीवर प्रतिक्रिया व्यक्त करत अप्रत्यक्षपणे आमदारांवर टीका केली. त्यालाही शेलार यांनी उत्तर दिले आणि ते ठाकरे यांच्या वर्मी लागले, अशी शक्यता आहे. शेलार म्हणाले होते, ‘मतदार ज्यांना निवडून देत नाहीत किंवा जे निवडून येत नाहीत, अशा व्यक्ती विधानसभेत जाण्याऐवजी विधाने करणाऱ्या कार्यक्रमात दिसतात,’ असे प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना दिले. विधानसभा निवडणुकीत खुद्द राज ठाकरे यांचे पूत्र अमित यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात दादरमध्येच पराभवाची चव चाखावी लागली, तसेच मनसेचा एकही उमेदवार निवडून विधानसभेत गेला नाही. अशावेळी ठाकरे यांना त्यावरून डिवचणे योग्य नसल्याचे मत एका मनसे कार्यकर्त्याने व्यक्त केले. औरंगजेब कबर हटविण्यासही राज ठाकरे यांनी विरोध केला.
(हेही वाचा डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्याला Iran कडून केराची टोपली; अणू करार करण्याकडे दुर्लक्ष )
पक्षात फार उत्सुकता नाही
राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस आणि काही वरिष्ठ भाजपा नेत्यांशी चांगले असले तर राजकारणात सद्यपरिस्थितिवर आधारित निर्णय घेतले जातात. त्याचप्रमाणे भाजपासोबत सध्या शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असल्याने मनसेला भाजपासोबत युती करून किती जागा लढवण्यास मिळतील याबाबत पक्षात फार उत्सुकता नाही. त्यामुळे मनसे भाजपासोबत जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
निवडणुका लांबणीवर
राज्यातील बहुतांश म्हणजे मुंबईसह, पुणे, नाशिक २९ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणे अपेक्षित आहे. महापालिका प्रभाग पुनर्रचना आणि ओबीसी आरक्षण हे दोन विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून महापालिका निवडणुका या निर्णयावर अवलंबून आहेत. पुढील २-४ महिन्यात निकाल आल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ पर्यंत निवडणूका होतील, अशी अपेक्षा आहे. (Raj Thackeray)
Join Our WhatsApp Community