रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार? सरकारची तयारी सुरू!

गृहविभागाच्या रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला.

फोन टॅप प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग, पोलिसातल्या बदली संदर्भातील रॅकेट, परमबीर सिंग आरोप पत्र आणि परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर गृहविभागाच्या रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

अहवालातील महत्वाचे मुद्दे : 

 • 27 जून 2020 ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान कोणत्याही भापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत.
 • 2 सप्टेंबर 2020 ते 28 ऑक्टोबर 2020 च्या काळात 154 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्या सर्व पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारसी विचारात घेऊन करण्यात आल्या.
 • जुलै 2020 मध्ये रश्मी शुक्लांनी इंडियन टेलिग्राफ अॅक्ट अन्वये सार्वनिक सुव्यवस्थेला धोक्याच्या कारणासाठी जाणीवपूर्वक दिशाभूल करुन काही खाजगी व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली.
 • मात्र, मूळ उद्देशाव्यतिरीक्त वेगळ्या प्रयोजनासाठी त्यांनी परवानगीचा वापर करुन फोन टॅपिंग केले. याबाबत रश्मी शुक्लांकडून स्पष्टीकरण घेण्यात आले.
 • रश्मी शुक्ला यांनी स्पष्टीकरण देताना गृहमंत्री व मुख्यमंत्री यांची व्यक्तीश: भेट घेऊन माफी मागितली.
 • तसेच, रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कौटुंबिक व्यथा, पतीचे निधन आणि मुलांचे सुरु असलेले शिक्षण ही कारणे सांगत आपली चूक कबुल करुन त्यांनी दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
 • महिला अधिकारी असल्याने चूक कबुल केल्यानंतर सौजन्याच्या दृष्टीकोनातून कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान केंद्रीय प्रतिनियुक्तीवर बदली झाली.
 • देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा रश्मी शुक्ला यांचा अहवाल उघड केला. तेव्हा पेन ड्राईव्हमधील डेटा उघड झाल्याची बाब समोर आली.
 • मात्र, शासनाला जेव्हा हा अहवाल प्राप्त झाला होता. तेव्हा त्यासोबत हा पेन ड्राईव्ह नव्हता.
 • प्रसारमाध्यमात उघड झालेल्या अहवालाची प्रत पाहता ती रश्मी शुक्ला यांच्याकडे असलेल्या ऑफिस कॉपीची प्रत आहे. त्यामुळे ती प्रत त्यांच्याकडूनच लीक झाली असा संशय आहे.
 • हा संशय सिद्ध झाल्यास रश्मी शुक्ला यांच्यावर कठोर कारवाईस पात्र ठरतील.
 • सदर अहवाल टॉप सिक्रेट असतानाही उघड झाले, ज्यांचे फोन टॅप झाले. त्यांची गोपनीयता धोक्यात आली व विनाकारण बदनामी झाली.
 • रश्मी शुक्ला यांनी जो अहवाल शासनाला सादर केला होता तो तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आला होता. तसेच, त्यावर हा अहवाल तपासून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
 • रश्मी शुक्ला यांचा अहवाल तपासल्यानंतर असे आढळले होते की, अहवालातील बाबी आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात तफावत होती.

(हेही वाचा : ठाकरे सरकारची अधिका-यांनी उडवली झोप! कॅबिनेटमध्येही गाजला मुद्दा)

सरकार शिवरायांची शिकवण विसरले!

दरम्यान दुपारी रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विसरले असल्याचे म्हटले होते. तसेच सरकारकडून आपण खूप मोठ्या ह्रदयाचे आहोत, हे दाखवण्याची चूक झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्व होते, चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले होते असे ते म्हणाले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या. माझे पती नुकतेच वारले आहेत. मग कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आले नसल्याचे आव्हाड म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here