वृक्ष छाटणीच्या मुद्दयावरुन भाजपला श्रेय देणार, की त्यांचे पंख छाटणार?

प्रशासनाला हाती धरुन हा प्रस्ताव पुन्हा राखून ठेवत उडणाऱ्या भाजपचे पंख सत्ताधारी पक्ष छाटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत धोकादायक झाड्यांच्या फांद्या आणि मृत झाडे कापण्यासाठी कंत्राटदारांची निवड होऊनही या कंत्राटाचा प्रस्ताव अद्यापही संमत झालेला नाही. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर अद्यापही झाडे पडून आहेत. त्यामुळे मंजुरीविना वृक्ष प्राधिकरणापुढे अडवून ठेवलेल्या या प्रस्तावांविरेाधात, भाजपने आवाज उठवल्यानंतर सोमवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास याचे श्रेय भाजपला मिळणार असून, प्रशासनाला हाती धरुन हा प्रस्ताव पुन्हा राखून ठेवत उडणाऱ्या भाजपचे पंख सत्ताधारी पक्ष छाटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपने दिला होता इशारा

मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी आणि मृत झाडांची कापणी करण्यासाठी प्रशासनाने कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा मागवली आहे. या निविदेत प्रशासनाच्या अंदाजापेक्षा २८ ते ४५ टक्के कमी बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. यातील कमी बोली लावणाऱ्या पात्र कंपनीची निवड करण्यात आली असून, याचा प्रस्ताव मंजुरीसाठी वृक्ष प्राधिरकरणाच्या सभेपुढे मार्च महिन्यापासून प्रलंबित आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सुमारे २४०० झाडांची पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपने या प्रलंबित कंत्राटाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करत, सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाने सोमवारी वृक्ष प्राधिकरणाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत झाडे छाटणीचा प्रस्ताव प्रलंबित असून, या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.

(हेही वाचाः महापालिकेविरोधात सदोष ‘वृक्षवधाची’ याचिका दाखल करणार भाजप!)

फांद्या उचलण्यासाठी कंत्राटदार नेमणार का?

या झाडांच्या छाटणीचा कंत्राट कालावधी हा ३ जून पर्यंत असून, हे कंत्राट संपुष्टात येणार असल्याने मार्च महिन्यातच प्रस्ताव आणला होता. परंतु जूनपर्यंत याचा कालावधी आहे, त्यामुळे याला मान्यता दिल्यास कंत्राटदारांना याचे कार्यादेश देऊन कामाला सुरुवात करता येईल. परंतु झाडांच्या फांद्यांची छाटणी ही पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असून, ती न झाल्याने चक्रीवादळात यापूर्वीच अनेक झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे पडझड झालेल्या झाडांच्या फांद्या आणि त्यांचा पालापाचोळा उचलण्यासाठी या कंत्राटदारांची नेमणूक करणार का, असा प्रश्न नगरसेवकांकडून केला जात आहे.

काय होणार?

त्यामुळे जर सोमवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यास याचे श्रेय भाजपला मिळणार आहे. हा प्रस्ताव अडवून कोणी ठेवला, असा प्रश्न भाजपकडून केला जात आहे. त्यांनी शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांवर बोट ठेवले होते. त्यामुळे शिवसेनेकडूनही हा प्रस्ताव या सभेमध्ये मंजूर न करता भाजपला श्रेय मिळणार नाही, याची काळजी घेण्याची शक्यता आहे. किंबहुना ४५ टक्क्यांपर्यंत कमी बोली लावलेली असल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करुन, भाजपचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचाः तौक्तेच्या प्रभावाने मुंबईत इतक्या झाडांची पडझड)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here