महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होईल? संजय राऊतांचं भाकीत खरं ठरेल?

88

संजय राऊत यांनी भाकीत केल आहे की हे शिंदे सरकार कोसळणार आहे आणि लवकरच सत्तापरिवर्तन होईल. ठाकरे सरकार २५ वर्षे चालेल असंही भाकीत त्यांनी केलं होतं. पण २.५ वर्षात आपापसातील भांडणामुळेच हे सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना अपमानास्पद होऊन राजीनामा द्यावा लागला. कारण त्यांच्यातल्याच बहुसंख्य नेत्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांवर संशय व्यक्त केला.

( हेही वाचा : सुषमा अंधारे शिवसेनेत आल्याने उजेड पडेल का? )

शिवसेना ही ठाकरेंची नाही अशी परिस्थिती

आता संजय राऊतांना पुन्हा सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे त्यांच्यासाठी नुकसानीचं कारण ठरलं. उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, ’एखाद्याला आपटायचं असेल तर त्याला आधी उचलावं लागतं.’ आपल्या आजोबांना नेमकं काय म्हणायचं होतं हे उद्धव ठाकरेंना कळलं नाही हे दुर्दैव. संजय राऊतांनी शरद पवारांच्या मदतीने त्यांना उचलून घेतलं आणि त्यानंतर इतक्या जोरात आपटलं की आता शिवसेना ही ठाकरेंची नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राऊत हे वरवर बेताल बडबड करणारे वाटले तरी हे हुशार आहेत. ते एका मिशनवर आहेत. त्यांचं मिशन त्यांच्या खर्‍या धन्याला खुश ठेवणं असं आहे आणि यात काही गैर नाही. आपण जिथे नोकरी करतो, त्या धन्याला खुश ठेवण्यासाठी आपल्याला परफॉर्मन्स दाखवावा लागतो. कर्तृत्व गाजवावं लागतं. शिवसेनेला ठाकरेंपासून वेगळी करुन राऊतांनी उत्तम कर्तृत्व गाजवून दाखवलेलं आहे. आता ते ’बंडखोर शिवसेना भवन देखील बळकावतील’ असे वक्यव्य आपल्या विरोधकांनाच सूचित करत असतात की आता पुढे तुम्हाला शिवसेना भवन बळकवायचे आहे बरं का.

पक्षाचं नुकसान केल्याशिवाय आता राऊत गप्प बसणार नाहीत

मूळ प्रश्न असा की राऊत ठाकरेंना पुन्हा सत्तेचे स्वप्न दाखवत आहेत. कारण आता पालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. पालिकेमध्ये ठाकरे यांच्या गटातील नेत्यांचं अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त व्हावं ही इच्छा संजय राऊतांची आहे आणि त्यासाठी आता ते कामाला लागलेले आहेत. म्हणून त्यांनी आदित्य ठाकरेंना निष्ठा यात्रेला पाठवलं. कारण त्यांना ठाऊक आहे की सामान्य शिवसैनिक आदित्य ठाकरेंशी एकनिष्ठ राहू शकत नाही. एकवेळ उद्धव ठाकरे स्वतः गेले असते तर त्यांना थोडीफार सहानुभूती मिळाली असती. पण बाळराजेंना पाठवून ती सहानुभूती देखील घालवली आहे. २०२४ च्या निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचं नुकसान केल्याशिवाय आता राऊत गप्प बसणार नाहीत. कदाचित त्यानंतरही ते उद्धव ठाकरेंना स्वप्न दाखवत राहतील. त्यांना ठाकरेंचं अजून किती नुकसान करायचं आहे, हे तेच सांगू शकतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.