शिवसेनेच्या उध्दव गट यांचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) होणार का याबाबत तर्क वितर्क लढवले जात असले तरी याठिकाणी कुणालाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही अशाप्रकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचा दसरा मेळावा एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानावर करण्यास परवानगी मिळाल्याने शिवाजीपार्कवरील मेळाव्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यासाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून महापालिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असला तरी काही दिवसांपूर्वी शिंदे गट आणि उध्दव गटांमधील शिवसेना राड्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली या मैदानात कोणालाही परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
( हेही वाचा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणार – मुनगंटीवार )
शिंदे गटाला बीकेसीत दसरा मेळाव्याला परवानगी
शिवसेनेतून शिंदे गट बाजूला झाल्यानंतर शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यासाठी उध्दव गटाने महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केला आहे. २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेने अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता. परंतु मागील दोन आठवड्यांपूर्वी शिंदे गटाने बीकेसीतील मैदानात दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, शिंदे गटाला बीकेसीत दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून परवानगी पुढील प्रक्रियाही पार पाडण्यात आली आहे.
तर पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार
शिंदे गटाला दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर, उध्दव गटानेही महापालिकेवर दबाव टाकून आपल्या अर्जावर निर्णय घेऊन परवानगी दिली जावी अशी मागणी केली आहे. शुक्रवारी उध्दव गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परवानगी का मिळत नाही, त्याला विलंब का होतो, याची माहिती जाणून घेतली. परंतु शिवसेनेच्या अर्जावर कोणत्याही प्रकारे आजवर निर्णय घेण्यात आलेला नाही. या अर्जावर महापालिकेच्या संबंधित सहायक आयुक्तांना परवानगी घेण्याचे अधिकार असले तरीही हा विषय महत्वाचा बनल्याने यावर खुद्द महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेणे आवश्यक असते. परंतु आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारच्या सुचना सहायक आयुक्तांना केल्या जात नसून परिणामी या अर्जावरील प्रक्रीया रखडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिंदे गटाला बीकेसीत मिळालेली परवानगीमुळे शिवाजीपार्कवर कोणालाच परवानगी दिली जाणार नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्याचे उध्दव गटाच्या शिवसेनेकडून जाहिरात बाजी करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात उध्दव गट आणि शिंदे गटालाही या ठिकाणी परवानगी नाकारली जाईल,असे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. या मैदानात दोन्ही गटांनी अर्ज केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून ही परवानगी जाईल,असे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याच्या दृष्टीकोनातून शिवाजीपार्कवर यंदा दसरा मेळाव्याला दोन्ही गटाला परवानगी नाकारली जाईल,अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना उध्दव गटाला जर परवानगी नाकारली तर पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community