हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सोमवारी, २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मान्यताप्राप्त नव्हे, तर मानलेले पक्षप्रमुख होतील. सोमवारनंतर शिवसेनेचे अधिकृत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेच राहणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार २३ जानेवारी २०१८ रोजी पक्षांतर्गत निवडणुका घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे ५ वर्षे पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. २३ जानेवारी २०२३ रोजी ही मुदत संपत आहे. त्याचवेळी पक्षप्रमुख पदाचा वाद हा निवडणूक आयोगात गेला आहे. शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने यावर काही निर्णय दिला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे २३ जानेवारीपासून उद्धव ठाकरे हे तांत्रिकदृष्ट्या पक्षप्रमुख नसतील हे स्पष्ट होत आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागला तरी आमचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेच
शिवसेना नेते अनिल परब म्हणाले, ‘निवडणुक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी ही औपचारिकता आहे. निकाल काहीही लागला तरी उद्धव ठाकरेच आमचे शिवसेना पक्षप्रमुख राहतील. कायदेशीर लढाई ही सुरुच राहिल. आम्ही शिवसैनिक जोपर्यंत उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख मानतोय तोपर्यंत त्यांच्या पदाला हात लावण्याची कुणाचीही हिंमत नाही.’
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकार काेसळण्याचे भाकित हास्यास्पद; बावनकुळे यांचे प्रत्युत्तर)
Join Our WhatsApp Community