गायरान जामीन अवैधरित्या खासगी व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीने अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्तारांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे सोमवारी विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता सत्तार यांच्या पाठोपाठ उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वरमधील नावलीमध्ये शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्यासंदर्भात काही कागदपत्रे महाविकास आघाडीच्या हाती लागली आहेत. या बांधकामाचा उल्लेख सातबारावर नाही. देसाई यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात या जमिनीचा शेत जमीन म्हणून उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम करण्यात आले आहे.
( हेही वाचा: विधानसभेत ठराव: कर्नाटकातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी कायदेशीर लढा देणार )
विरोधक देसाईंना घेरण्याच्या तयारीत
सातबारावर या बांधकामाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. ही जमीन इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने बांधकामाला परवानगी नव्हती. त्यामुळे परवानगी न घेता अवैध बांधकाम केल्याचे ‘मविआ’चे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ही जमीन शंभूराज देसाई यांच्याच नावावर असल्यामुळे हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून सरकारला घेरण्याच्या तयारी सुरू असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community