अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत सोमवारी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सत्तार यांनी गायरान जमीन खासगी व्यक्तीला विकल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरले. अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी जनाची नव्हे तर मनाची तर लाज ठेवून राजीनामा द्यायला हवा, असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधान सभेत केला.
पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना वाशिममधील गायरान जमीन अब्दुल सत्तार यांनी बेकायदेशीररित्या विकली. तब्बल दीडशे कोटींची किंमत असलेली ३७ एकर जमीन अब्दुल सत्तार यांनी कवडीमोल भावाने एकाला विकली. न्यायालयानेही या प्रकरणात संबंधित मंत्री दोषी असल्याचे म्हटले आहे. हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा.
( हेही वाचा: सीमावाद संपेपर्यंत कर्नाटकव्याप्त मराठी प्रदेश केंद्रशासित करा; उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी )
शिवीगाळही चर्चेत
- अब्दुल सत्तार कृषिमंत्री झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांत सातत्याने वाद निर्माण होत आहे. एका महिला खासदाराला अब्दुल सत्तार यांनी अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
- त्यानंतर एका जिल्हाधिकाऱ्याला दारू घेता का दारू?, असा प्रश्न अब्दुल सत्तार यांनी विचारला. अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी जनाची नव्हे तर मनाची तर लाज ठेवून राजीनामा द्यायला हवा.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे अब्दुल सत्तार मंत्रिपदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फडणवीसही तेवढेच जबाबदार आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.