टीईटी घोटाळ्याचा मुद्दा महाविकास आघाडीच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. हा घोटाळा महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात झाला असून, टीईटी परीक्षा घेण्यासाठी अपात्र कंपन्याना कोणी पात्र केले, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
टीईटी घोटाळ्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आहेत. त्यामुळे पदाचा दुरुपयोग करणाऱ्या सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. बुधवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून मविआने सत्तार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न कामकाजाच्या नियमात बसत नसल्यामुळे तो प्रश्नावलीतून काढण्याचा निर्णय घेतल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषित केले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग करून निषेध नोंदवला.
टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
दरम्यान, या घोटाळ्याला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा दावा करत भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी ‘मविआ’वर जोरदार हल्लाबोल केला. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही केली. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अपात्र कंपन्यांना पात्र केल्यामुळे टीईटी घोटाळा घडला. हे मंत्रालयीन स्तरावर म्हणजेच तत्कालीन सरकारकडून झालेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, यामागे कोण आहेत, याचा शोध घेतला जाईल.
Join Our WhatsApp Community