मराठी भाषिक राज्य असलेल्या महाराष्ट्रातून ‘मुंबई आकाशवाणी’च्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागाचे कार्यालय स्थलांतरीत केले जाणार असल्याची बाब समोर आली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी पॉईट ऑफ इन्फोर्मेशनच्या माध्यमातून ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
भुजबळ म्हणाले की, भारतातील आकाशवाणीच्या चारशेहून अधिक केंद्रात वेगळा ठसा उमटवून असलेले आणि अनेकदा सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरविल्या गेलेल्या मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभाग मुंबईतून स्थलांतरीत केला जात आहे. आकाशवाणी मुंबईचा पाचवा मजला रिकामा केला जात असून या ठिकाणी सध्या पाडकाम सुरू आहे. यागोदर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या भेटीनंतर हे कार्यालय स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. सीमाप्रश्नावर महाराष्ट्राला खुले आव्हान दिले जात असताना महाराष्ट्राचे सरकार गप्प असल्याने आकाशवाणी मराठीसाठी सरकार काही करेल की नाही याबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
साधारणतः शंभर वर्षांपूर्वी जिथून देशातील आकाशवाणीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या मुंबई आकाशवाणीचाच गळा आता घोटला जात आहे. प्रादेशिक विभागातील वृत्त संपादक आणि उपसंचालक ही दोन्ही पदेही यापूर्वी अशाच पद्धतीने अनुक्रमे कोलकाता आणि श्रीनगरला हलविली गेलेली आहे. आता तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या मुंबईतच मराठी बेदखल करण्याची तयारी सुरू झालेली आहे. मुंबईतल्या आमदार निवासाच्या समोरच्या इमारतीत आकाशवाणी मुंबईचे ६ मजले आहे. या ठिकाणी तिथे १२०० हून अधिक कायम कर्मचारी आणि शेकडो हंगामी कामगार काम करत आहे. त्यांना इतरत्र स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला जात आहे, हा निर्णय अतिशय अयोग्य आहे.
आकाशवाणी मुंबईच्या प्रोग्रामिंग विभागापेक्षा मुंबईच्या बातम्यांना सर्वाधिक श्रोतावर्ग आणि जाहिराती मिळत आहे. अजूनही खाजगी रेडिओ वाहिन्यांना बातम्या प्रसारित करायची परवानगी सरकारने दिलेली नसल्यामुळे रेडिओच्या बातम्या या फक्त आकाशवाणीच देत आहे. अशा परिस्थितीत वृत्तविभागाला अधिकाधिक पायाभूत सुविधा देऊन मजबूत करण्याऐवजी मुंबईतूनच मराठी वृत्तविभागाला विस्थापित करण्याचे षडयंत्र आखले गेले असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खासगी विकासकाला मदत – भुजबळ
- पेडर रोडवरील फिल्म डिव्हीजनची जागा खासगी विकासकाला देऊन तो विभाग आकाशवाणीच्या पाचव्या मजल्यावर आणण्याचे सरकारचे मनसुबे निदर्शनास येत आहे. खाजगी उद्योजकांचा पेडर रोडवरील फिल्म डिव्हीजन आणि मुंबई आकाशवाणीच्या जागेवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- सरकारी संस्था कमकुवत करून मुंबईतील मध्यवर्ती जागा खाजगी उदयोजकांच्या घशात घालण्याचे षड्यंत्र आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई प्रादेशिक वृत्तविभागासाठी आलेला निधी न वापरताच परत पाठविण्यात आलेला आहे.
- महाराष्ट्रातून यापूर्वी सहजासहजी बाहेर जाऊ दिलेल्या संस्थासारखी आकाशवाणी मुंबईची गत होऊ नये यासाठी राज्य सरकारने करावयाची कार्यवाही व उपाययोजना कराव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी मांडलेला प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. शासन या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करेल आणि हे कार्यालय स्थलांतरीत होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिले.