हिवाळी अधिवेशनात ‘बॉम्ब’ फोडण्याची भाषा करीत नागपूरात दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंची सगळी अस्त्रे निकामी ठरली. त्यामुळे त्यांनी सभागृहात बसून सरकारला हादरवून टाकण्याचा निश्चय केला. पण, ८४ तास चाललेल्या हिवाळी अधिवेशनात ४६ मिनिटांपलीकडे ते सभागृहात बसू शकले नाहीत. त्यामुळे सरकारला हादरे बसणे सोडा, उलट त्यांच्याच नेत्यांच्यापाठी भूखंड घोटाळा, एसआयटी आणि उच्चस्तरीय चौकशीचा ससेमिरा लागला.
तीन वर्षांनंतर नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप ३० डिसेंबरला वाजले. १९ ते ३० डिसेंबर या काळात चाललेल्या अधिवेशनात विकासावर कमी आणि आरोप-प्रत्यारोपांवर अधिक चर्चा झाली. या अधिवेशनाचे कामकाज ८४ तास १० मिनिटे चालले. वेगवेगळ्या कारणांनी सदस्यांनी जो गोंधळ घातला, त्यामुळे ८ तास ३१ मिनिटे वाया गेली. दोन्ही सभागृहात १२ विधेयके मंजूर झाली. १०६ लक्षवेधी सूचना आणि ३६ तारांकित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
( हेही वाचा: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे टायटल अमोल कोल्हे यांनी केवळ फायद्यासाठी वापरलं: विश्वास पाटील )
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात पुरावे घेऊन आमदार उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले होते. ते काहीतरी मोठा बॉम्ब फोडणार, असे चित्र संजय राऊत यांनी माध्यमांत उभे केले होते. त्यामुळे सत्ताधारीही काहीसे चिंतेत होते. पण, ठाकरेंनी आणलेले सगळे बॉम्ब निकामी ठरले. एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यावर उद्धव सेनेने अधिवेशनात हल्ला चढवला, भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. परंतु, सेनाप्रमुखच गायब असल्याने आरोपांची राळ फारकाळ टिकली नाही.
आमदारांची उपस्थिती किती?
अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ९१.३२ टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ५०.५७ टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ७९.८३ टक्के इतके होते. विशेष म्हणजे आमदार उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरात उपस्थित असूनही, त्यांनी केवळ एकदा ४६ मिनिटे सभागृहात हजेरी लावली.
Join Our WhatsApp Community