राजकारणात काहीही घडू शकते, असे कायम बोलले जाते, पण भाजापा आणि काँग्रेस एकत्र येणे हे कदापि शक्य नाही, परंतु महाराष्ट्रात हे शक्य झाले आहे. त्याला कारण ठरली आहे राज्यसभेतील पोटनिवडणूक! काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे निधन झाल्यावर त्याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपाने उमेदवार देऊ नये, निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. फडणवीस यांनी चक्क ती मान्य केली. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.
संजय उपाध्याय अर्ज मागे घेणार!
जेव्हा राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा काँग्रेसने त्यासाठी रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर लागलीच भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेससाठी अडचणीची ठरली होती. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरता प्रयत्न केले. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशी विनंती केली. ही विनंती भाजपाने मान्य केली. त्यानुसार या ठिकाणाहून आता भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय हे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.
(हेही वाचा : धर्मांतरणाचे रॅकेट चालवणा-याला नाशिकमधून अटक! नाव बदलून रचला इस्लामीकरणाचा डाव)
या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी झाली. या सर्व जागांवर ४ ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.
Join Our WhatsApp Community