देशातील ‘ते’ तिन्ही कृषी कायदे रद्द करणार! पंतप्रधानांची मोठी घोषणा

देशातील छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी या शुद्ध हेतूसाठी आम्ही ३ कृषी कायदे बनवले होते, त्याचे देशातील अर्थतज्ज्ञ, शेतकरी संघटना यांनी स्वागत केले, मात्र काही शेतकऱ्यांना आम्ही समजावू शकलो नाही, त्यात आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळे आम्ही हे तिन्ही कायदे रद्द करत आहोत. येत्या संसदीय अधिवेशनात हे कायदे रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित करताना केले.

शेतकऱ्यांना समजावण्यात अपयशी ठरलो!

देशातील छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी, ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत व्हावी, या उद्देशासाठी आम्ही ३ कृषी कायदे आणले होते. त्यावेळी त्यांचे देशभरातून स्वागत करण्यात आले. त्यावेळी देशातील अर्थतज्ज्ञ, शेतकरी संघटना, व्यापारी वर्ग यांनीही याचे स्वागत केले. मात्र काही शेतकऱ्यांना आम्ही हे समजावण्यात अपयशी ठरलो. त्यांना समजावण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले. विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, त्यांच्या आदेशानुसार त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या शेतकऱ्यांना अखेरपर्यंत समजावण्यात आम्हाला यश आले नाही. त्यामुळे आम्ही हे तिन्ही कायदे मागे घेण्याचा निर्णय घेत आहोत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

आंदोलनकारी शेतकऱ्यांनी घरी जावे!

त्यामुळे आता आंदोलनकारी शेतकऱ्यांनी घरी जावे, शेतावर जावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here