‘मनसे’ पदाधिकाऱ्यांकडून महिलेला मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल

123

गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या बॅनरला मनाई करणाऱ्या महिलेला मनसेचे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे राजू अरगिळे आणि संदीप लाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ‘दस-याला मुंबईत हजर रहा’, शिंदे गटातील आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना! दसरा मेळाव्यावरुन वातावरण तापणार?)

महिलेला मारहाण करणाऱ्या या व्हिडिओवरून मनसे पदधिकारी विनोद अरगिळे विरोधात जोरदार टीका होत आहे. परंतु या व्हिडिओची दुसरी बाजू देखील असून या महिलेने हे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केले, तीने घाणेरड्या शब्दात शिव्या देत बॅनरसाठी लावण्यात आलेला बांबू उखडून टाकला, असे विनोद अरगिळे यांनी म्हटले आहे.

दक्षिण मुंबईतील कामठीपुरा ८ गल्ली या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव मंडळाजवळ स्थानिक मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे व इतर मनसैनिकानी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी लाकडी बांबू ठोकले होते, हे बॅनरचे बांबू नेमके या महिलेच्या औषधाच्या दुकानासमोर आल्यामुळे ५७ वर्षीय या महिलेने हे बांबू उखडले, यावेळी तिने अश्लील भाषेचे शिव्यागाळ करून उलट सुलट बोलू लागताच संतापलेले मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे यांनी तीला दोन ते तीन वेळा धक्का देऊन तिच्या कानशिलात लगावून दिली, हा सर्व प्रकार तेथील काही जणांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करून तो व्हिडिओ व्हाट्सअप्पवर व्हायरल केला.

एका महिलेला झालेल्या मारहाणीच्या या व्हिडिओमुळे संतापाचे वातावरण पसरले होते, मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अखेर या व्हिडिओची दखल घेत नागपाडा पोलिसांनी या महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून तिचा जबाब नोंदवत विनोद अरगिळे सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी कृती चुकीची होती, हे मलाही योग्य वाटत नाही, परंतु चुकी त्या महिलेची आहे, सुरुवातीला ती ज्या पद्धतीने वागली त्यामुळे कुणालाही राग आला असता, मला चूक करण्यासाठी या महिलेने प्रवृत्त केले, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.