वरळी कोळीवाड्याचेही विभाजन: कोळीवाड्याला मिळणार दोन नगरसेवक

105

मुंबईचे २३६ प्रभागांचे आरक्षण जाहीर आले असून काही नगरसेवकांचे वॉर्ड हे विस्कळीत झाले आहेत. त्यातच आता ही माहिती समोर आली आहे की, शिवसेनेचे युवा नेते व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विधानसभेतील कोळीवाड्याचे दोन भाग करण्यात आले आहे. या कोळीवाड्यात शिवसेनेच्या नगरसेविका व माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आहेत. मात्र शिवसेनेच्या नगरसेविकेचा हा प्रभाग तोडून तो शिवसेनेच्या अन्य नगरसेवकाच्या प्रभागात जोडण्यात आला आहे. या दोन्ही नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वरळी कोळीवाड्याचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे वरळी कोळीवाड्याला आता दोन नगरसेवक लाभणार आहेत.

( हेही वाचा : मनपा निवडणुकीत राज ठाकरेंचा ‘वन मॅन शो’! )

कोळीवाड्याचे विभाजन

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या २३६ प्रभागाच्या रचनेबाबत आता सर्वच पक्षाच्या नगरसेवकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी पक्षाने आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा प्रकारे मिळतील याची रणनीती आखत प्रभागांचे आरक्षण टाकले असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेचे युवा नेते आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे ज्या विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहे त्याच विधानसभेतील कोळीवाड्याची दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या विभागात शिवसेना नगरसेविका आणि माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर या प्रतिनिधित्व करत आहे. परंतु त्यातील ७० टक्के भाग हा बाजुचे शिवसेना नगरसेवक आणि बेस्टचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील या कोळीवाड्याचे चक्क विभाजन करण्यात आले आहे.

विद्यमान शिवसेना नगरसेविका हेमांगी वरळीकर यांचाकडे हा पूर्णपणे कोळीवाडा होता. परंतु त्यांच्या भागात काही भागच कोळीवाड्याचा ठेवून त्यांना शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक समाधान सरवणकर प्रतिनिधीत्व करत असलेल्या प्रभागातील सिध्दीविनायक मंदिराच्या दिशेकडील काही भाग जोडण्यात आला आहे.

( हेही वाचा : मुंबईची प्रभाग रचना कशी असणार? जाणून घ्या… )

पायाभूत सेवा देताना अडचणी

कोस्टल रोडच्या मुद्दयावरून मागील काही दिवसांपासून वरळी कोळीवाड्यात कोळीबांधव आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे कोळीवाड्यात आता शिवसेनेला काही अंशी पुरक वातावरण नाही. तसेच या आंदोलकांना स्थानिक आमदार व पालकमंत्री हे भेट घ्यायलाही न आल्याने काही प्रमाणात ही नाराजी वाढलेली आहे. त्यामुळेच या कोळीवाड्याचे दोन तुकडे करत दोन नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये त्यांचे विभाजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सर्व कोळीवाडे हे एका नगरसेवकाच्या प्रभागांमध्ये एकसंध ठेवण्यात आलेले असताना वरळी कोळीवाड्यांमधील प्रभागांची रचना बदलण्यात आल्याने या कोळीवाड्यामध्ये पायाभूत सेवा सुविधा पुरवताना मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आपल्या प्रभागातील वरळी कोळीवाड्यातील काही भाग दुसऱ्या प्रभागात समाविष्ठ केल्याचे मान्य केले आहे. मात्र, यासंदर्भात आमचा अभ्यास सुरु असून निश्चितच यासंदर्भात हरकत नोंदवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.