अखेर राणे-ठाकरेंचे जुळलेच!

आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट साडेतीन तासांत जाता येणार आहे.

नारायण राणे…केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री…पण याच नारायण राणे आणि ठाकरे कुटुंबाशी असलेला वाद गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम केला अन् राणे ठाकरे वादाचा नवा अंक राज्यात सुरु झाला. गेली अनेक वर्ष हा वादाचा अंक तसाच सुरु असून, दिवसेंदिवसच हा वाद अधिकच विकोपाला जाताना दिसत आहे. नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार करतात. नुकताच राणेंच्या जन आर्शीवाद दौऱ्यावेळी तर राणेंनी केलेल्या टिकेने राज्याचे राजकारण तापले आणि राज्यातील जनतेने राणे-ठाकरे वाद पुन्हा पाहिला. मात्र एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या राणे-ठाकरे यांचे एका बाबतीत मात्र एकमत झाले आहे. राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेल्या ठाकरे राणेंमध्ये एका प्रकल्पाने का होईना जुळले, असे म्हणावे लागेल.

आदित्य ठाकरेंच्या वरळीतून थेट राणेंच्या सिंधुदुर्गात!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदार संघ तर सिंधुदुर्ग जिल्हा हा राणेंचा बालेकिल्ला राहिला आहे. आजही या जिल्ह्यात राणेंचा दबदबा पहायला मिळत आहे. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट साडेतीन तासांत जाता येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा बृहत् आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या तसेच सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात झाली असून पुढील दोन वर्षांत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना वरळी उन्नत मार्गावरून थेट सिंधुदुर्गला केवळ साडेतीन तासांत जाता येणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाल्याबरोबर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वर्षभरात आराखड्याचे काम पूर्ण करून प्रकल्पाला आर्थिक, प्रशासकीय मंजुरी आणि इतर सर्व प्रकारच्या परवानग्या घेत पुढील दोन वर्षात प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. काम सुरू झाल्यापासून चार ते पाच वर्षांत ते पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असून २०२७-२८ मध्ये हा द्रुतगती मार्ग वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य आणि आघाडीत बिघाडी!)

असा असेल महामार्ग

चिरलेवरून हा मार्ग पुढे राष्ट्रीय महामार्ग १७ आणि मुंबई-सिंधुदुर्ग कोकण सागरी मार्गाच्या मधून जाणार आहे. कोकण सागरी महामार्ग थेट नसून, अनेक ठिकाणी पूल बंद, नादुरुस्त आहेत. त्यामुळे सागरी कोकण मार्गाचे कामही एमएसआरडीसीकडून केले जाणार असून भविष्यात अंदाजे ५४० किमीचा सागरी मार्गही कोकणात जाण्यासाठी उपलब्ध होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे’चा बृहत् आराखडा चार पॅकेजमध्ये तीन कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. यासाठी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणही करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here