आता शिवसेना होणार ‘राष्ट्रीय’? कशी मिळेल नवी ओळख?

एका केंद्रशासित प्रदेशात लोकसभेची जागा जिंकली म्हणजे शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल का?

239

राज्यात शिवसेना-भाजपाची युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांमधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दीड वर्षापासून हे दोन्ही पक्ष जोरदार रस्सीखेच करत शक्तीप्रदर्शन करत आहेत. या काळात राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये कुठे कमळाने धनुष्य वाकवले, तर कुठे सत्तेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पक्षाने आपला कणखर ‘बाणा’ दाखवून दिला.

हा गल्लीतला ‘सामना’ चांगलाच रंगात असताना, दिल्लीत सत्तेत असलेल्या भाजपाला शिवसेनेने त्यांच्याच होम ग्राऊंडवर चारीमुंड्या चीत केले. दादरा-नगर हवेलीतील लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकरांच्या विजयामुळे शिवसेनेने भाजपाच्या बालेकिल्ल्यातल आपला भगवा फडकवला. त्यामुळे गेली अनेक वर्ष प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखल्या जाणा-या शिवसेनेने राज्याबाहेर विजय मिळवत एकप्रकारे सीमोल्लंघन केले आहे.

(हेही वाचाः दादरा-नगर हवेली विजय : सेनेचे हे सीमोल्लंघन पहिले नव्हे!)

शिवसेनेला दिल्ली तख्ताचे वेध, पण…

ऐन दिवाळीच्या तोंडावर हा विजय मिळाल्याने शिवसेना नेत्यांचे भाजपाविरोधी फटाके जोरात वाजत आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना आता दिल्लीच्या तख्ताची स्वप्न पडू लागली असून, ते सत्यात उतरवण्याचे ‘शिवधनुष्य’ त्यांनी उचलले आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण करणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण केवळ एका केंद्रशासित प्रदेशात लोकसभेची जागा जिंकली म्हणजे शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल का?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोण देतं?

भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. आता गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे, असा एक आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी धरुन, भाजपा शिवसेनेशी ‘पक्षपात’ करेल का, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी पक्षाला काही निकष पूर्ण करावे लागतात. त्यानंतरच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह मिळते.

(हेही वाचाः “आम्ही नको ती अंडी उबवली”, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला)

काय आहेत राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीचे निकष?

  • पक्षाला लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत चार किंवा अधिक राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळाली आणि त्यासोबतच लोकसभेत एकूण चार जागा मिळाल्या तर…
  • पक्षाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2 टक्के जागा जिंकल्या आणि त्या पक्षाचे उमेदवार किमान तीन राज्यांतून निवडून आले तर…
  • पक्षाला चार राज्यांमधून राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली असेल तर…

यापैकी कोणताही एक निकष पूर्ण करणा-या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळते. अशा पक्षाला संपूर्ण देशातील निवडणुकांसाठी एक चिन्ह दिले जाते. त्यामुळे आता राज्याबाहेर मिळवलेल्या या पहिल्या विजयानंतर शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह मिळण्याची ‘चिन्हं’ हळूहळू दिसू लागली आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

(हेही वाचाः शिवसेना भवनासमोर कंदील लावण्यावरून सेनेतच चढाओढ!)

Table 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.