Yakub Memon: मेमनच्या कथित नातेवाईकांसोबत किशोरी पेडणेकरांचा व्हिडिओ व्हायरल; आरोप – प्रत्यारोप सुरु

155

मुंबई बाॅम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा रऊफ मेमन बरोबर बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रऊफ मेमन याने याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाने धमकी दिली असल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्या व्हायरल होणा-या व्हिडिओवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपचे आरोप हास्यास्पद असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

व्हायरल होणा-या व्हिडिओनुसार, किशोरी पेडणेकर हे एका बैठकीत आहेत. या बैठकीत रऊफ मेमनही उपस्थित आहे. त्याशिवाय, इतर व्यक्ती, अधिकारीदेखील दिसत आहेत. हा व्हिडिओ बडा कब्रस्तानच्या बैठकीतील असल्याचे म्हटले जात आहे. बडा कब्रस्तान आणि जुमा मशिदीशी संबंधित नसतानाही रऊफ त्या बैठकीत उपस्थित होता, अशी माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ 2021 मधील असल्याचे म्हटले जात आहे.

अतुल भातखळकरांचा आरोप 

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींना टायगर मेमनच्या नावाने धमकी देण्यात आली. त्याची तक्रार करण्यात आली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ट्रस्टींनी अल्पसंख्यांक मंत्री म्हणून नवाब मलिक यांच्याकडे तक्रार केली. मात्र, नवाब मलिक यांचे दाऊदशी असलेल्या संबंधांमुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तर, मुख्यमंत्री पदाच्या मोहापाई उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही चौकशीचे आदेश दिले नसल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

( हेही वाचा: ना दहिहंडीच्या शुभेच्छा, ना गणेशोत्सवाच्या; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र! )

किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

भाजपची लोक ही डोक्यावर पडलेली लोक आहेत. त्यांचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नसल्याचा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय महिलेवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.