राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून नेहमीच या ना त्या कारणावरून त्यातील नेते मंडळी चर्चेत आहेत. आता काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी धक्कादायक विधान केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केला असून, अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे त्यांनी बाळासाहेब थोरात यांना मदतीसाठी साद घातली आहे.त्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एका कार्यक्रमात बोलत होत्या. शळद येथील मराठा हॉटेल येथे अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते.
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?
मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढलेले नव्हते. या कामाला 450 रुपये मिळत होते. आता आम्ही हे वाढवून 1,125 रुपये केले. यासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास बरे होईल, असे ठाकूर म्हणाल्या.
(हेही वाचाः राज ठाकरेंवर राष्ट्रवादीने का केला ‘ट्विटर’ हल्ला?)
प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहचायचं याचाच विचार आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं.
Join Our WhatsApp Community