स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा जाधव ‘यशवंत’!

'हिंदुस्थान पोस्ट'ने या निवडणुकीत ऑक्टोबर फॉर्म्युला राबवला जाईल, असे भाकीत केले होते. त्याप्रमाणे काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि यशवंत जाधव यांच्या विजयाचा मार्ग पुन्हा सुकर झाला. 

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यशवंत जाधव हे पुन्हा ‘यशवंत’ ठरले आहेत. सलग चार वेळा निवडून येत त्यांनी अध्यक्ष पदाचा चौकार ठोकला आहे. या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने आपला उमेदवारी अर्ज भरत सेनेची कोंडी केल्याची हवा माध्यमांनी निर्माण केली होती. परंतु ‘हिंदुस्थान पोस्ट’ने या निवडणुकीत ऑक्टोबर फॉर्म्युला असेल असे भाकीत केले होते. आणि त्याप्रमाणे काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि जाधव यांच्या विजयाचा मार्ग पुन्हा सुकर केला. या निवडणुकीत काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ, तर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचे सदस्यांनी सेनेला मतदान केल्याने कोणताही करिष्मा घडला नाही, पुन्हा यशवंत जाधव हे सलग चौथ्यांदा विजयी झाले.

काँग्रेसचा माघार, मतदानात तटस्थ 

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी ५ एप्रिल रोजी पार पडली. शिक्षण समिती अध्यक्ष पदी शिवसेना नगरसेवक निवडून आल्याने स्थायी समितीत सेनेचे संख्याबळ १ ने वाढून १२ एवढे झाले. शिक्षण समिती अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. त्यामुळे  स्थायी समितीत शिवसेनेचे उमेदवार यशवंत जाधव यांचे पारडे जड झाले होते. त्यातच काँग्रेस उमदेवार आसिफ झकारीया यांनी आपला अर्ज प्रत्यक्ष मतदानापूर्वी १५ मिनिटे आधी मागे घेतला. त्यामुळे ही लढत सेना विरुद्ध भाजप अशी लढत अशी झाली.

(हेही वाचा : वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑक्टोबर फॉर्म्युला!)

राष्ट्रवादी काँग्रेस व सपाची मते सेनेला

या निवडणुकीतील मतदानात काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव व सपाचे रईस शेख यांनी शिवसेनेच्या यशवंत जाधव यांना मतदान केले. त्यामुळे जाधव यांना १४ मते तर भाजपचे राजेश्री शिरवडकर यांना ०८ एवढी मते पडली. तर भाजपचा एक सदस्य गैरहजर राहिला, भालचंद्र शिरसाट यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे पिठासीन अधिकारी असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्वाधिक मते मिळवणाऱ्या जाधव यांना विजयी घोषित करत अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले.. त्यामुळे सलग चौथ्यांदा विजय मिळवत जाधव यांनी समिती अध्यक्ष पद कायम राखले आहे. कोरोनो कोविडच्या काळात यशवंत जाधव यांच्यात महापौर यांच्यामध्ये शीतयुध्द सुरु असल्याने त्यांचा पत्ता कापण्याचा जोरदार प्रयत्न सुरु होता. तरीही त्यांनी पुन्हा उमेदवारी मिळवत विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर विरोधी पक्ष त्याच्या विरोधात आक्रमक होत त्यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्न केला होता. तरीही त्यांनी चौथ्यांदा उमेदवारी मिळवत विजयी ठरले.

(हेही वाचा : शिक्षण समिती अध्यक्षपदी सेनेच्या संध्या दोशी!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here