मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी सलग चौथ्यांदा विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांना पक्षाने संधी दिली आहे. जाधव यांनी गुरुवारी आपल्या अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज महापलिका सचिव संगीता शर्मा यांना सादर केला. स्थायी समितीत शिवसेनेचे अधिक संख्याबळ असल्याने जाधव हे विजयाचा चौकार ठोकत आता यापूर्वीचे स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर आणि राहुल शेवाळे यांची बरोबरी करणार आहेत. तर बेस्ट वगळता अन्य सर्व समित्यांचे अध्यक्ष कायम राहणार आहेत. बेस्ट समिती अध्यक्षपदी वरळीचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.
सलग चौथ्यांदा संधी
मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यानंतर, पहिल्या वर्षी शिवसेनेने भांडुपचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांची अध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर पहिल्याच वर्षी कोरगावकर यांना बाजूला करुन शिवसेनेने सभागृह नेते असलेल्या यशवंत जाधव यांची निवड केली. तेव्हापासून सलग तीन वर्षे ते अध्यक्षपदी असून पक्षाने आता त्यांना चौथ्यांदा संधी देत अध्यक्षपदाचा चौकार ठोकण्याची संधी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव संगीता शर्मा यांच्याकडे सादर केला आहे.
(हेही वाचाः छ. शिवाजी महाराज मैदानाच्या नुतनीकरणाला स्थायी समितीची मंजुरी!)
पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध
यशवंत जाधव यांनी या अध्यक्षपदाला न्याय देताना प्रसंगी विरोधकांना आणि प्रशासनाला शिंगावर घेतले. यावरुन बऱ्याचदा त्यांच्यावर आरोपही झाले. सर्व विरोधक एकजूट होऊन त्यांचा पत्ता कापण्यासाठी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पक्षाने विरोधकांची तमा न बाळगता जाधव यांच्या मागे सक्षमपणे उभे राहिले. त्यामुळे विरोधक आणि स्व-पक्षातील काहींना निराश होण्याची वेळ आली होती. यशवंत जाधव यांचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चांगले संबंध आहेत. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही त्यांच्यावर अधिक विश्वास असून, त्या विश्वासाच्या जोरावरच त्यांना पक्षाकडून चौथ्यांदा संधी दिली जात आहे.
(हेही वाचाः म्हणून मुंबईतील ‘ते’ सर्व मॉल बंद होणार!)
कांदिवली येथील शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांना शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड केल्यानंतर, पुन्हा त्यांनाच संधी दिली आहे. तसेच सुधार समिती अध्यक्षपदी सदा परब यांनाही पुन्हा संधी आहे. दोशी दुसऱ्यांदा तर सदा परब हे तिसऱ्यांदा अध्यक्ष बनणार आहेत. सदा परब हे तिसऱ्यांदा अध्यक्ष बनल्यास यशोधर फणसे यांच्या आजवरच्या अध्यक्ष पदाची बरोबरी करणार आहेत.
बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी पुन्हा चेंबूरकरवर मदार
बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्ष प्रवीण शिंदे हे स्वतःच उत्सुक नसल्याने तसेच ते सक्षम नसल्याने त्यांनी यातून माघार घेतला. त्यामुळे बेस्ट समिती अध्यक्ष बदलला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे शिंदे यांना बाजूला करून अनुभवी चेंबूरकर यांच्या हाती बेस्टची धुरा सोपवली असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community