येरवडा कारागृहातील कैद्यांना आता स्मार्टकार्ड फोनची सुविधा मिळणार आहे. तामिळनाडूस्थित एका कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले असून, या सुविधेचा गैरवापर होणार नाही, याची जबाबदारी कारागृह अधीक्षकांवर देण्यात आली आहे.
राज्यातील कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता एमटीएनएल आणि बीएसएनएल कंपनीच्या कॉईन बॉक्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, सद्य:स्थितीत बाजारामध्ये सहजासहजी कॉईन बॉक्स उपलब्ध होत नाही. ते नादुरुस्त झाल्यावर त्याची दुरुस्तीही करुन मिळत नाही. तसेच ज्या कैद्यांना अतिसुरक्षा विभाग, सुरक्षायार्ड व विभक्त कोठड्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात आलेले आहे, त्यांना कॉईन बॉक्सजवळ नेणे कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. त्यामुळे कैद्यांना दूरध्वनी सुविधा देताना कॉईन बॉक्सऐवजी साधे मोबाईल फोन वापरण्यास परवानगी देण्याची विनंती राज्यातील काही कारागृह अधीक्षकांनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षकांकडे (कारागृह व सुधारसेवा,पुणे) केली होती.
त्यानुषंगाने येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तामिळनाडूमधील अॅलन ग्रुपला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
…या अटींचे पालन करावे लागणार
- या कंपनीला ही सुविधा उपलब्ध करुन देताना महाराष्ट्र कारागृह नियमावली, १९७९ मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
- कारागृहातील अंतर्गत सुरक्षा ही कारागृहाची जबाबदारी असल्याने, या स्मार्ट कार्ड सुविधेचा गैरवापर होणार नाही, याची संबंधित कारागृह अधीक्षक यांनी खबरदारी घ्यावी.
- अॅलन ग्रुप या कंपनीने स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याबाबतचा अनुपालन अहवाल अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनास सादर करावा